पान:आमची संस्कृती.pdf/112

हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / १०५

जो रक्ताचा संबंध, तेवढाच निकटचा संबंध जीवशास्त्राच्या दृष्टीने बहिणीची मुले व बहिणभावांची मुले ह्यांमध्ये असतो. काही जमाती ह्या दोन्ही अपत्यांतील विवाह त्याज्य ठरवितात, तर काही जमातीत भावांच्या मुलांची (चुलत भावंडांची) लग्ने होत नाहीत पण बहिणीच्या मुलांचे भावाच्या मुलाशी (आते-मामे भावंडांचे) लग्न योग्य समजले जाते. तेव्हा अशा कोणत्याही त-हेच्या लग्नाला तडकाफडकी बेकायदा ठरवायचे असेल तर आम्हांला ते अयोग्य वाटते' ही सबब पुरणार नाही. अशा त-हेच्या लग्नाचे सामाजिक व शारीरिक परिणाम काय होतात हे ठरवून मगच ते योग्य की अयोग्य हे ठरविता येईल. मामा-भाचीच्या लग्नाच्या प्रश्नाचा अभ्यास झाला पाहिजे. अशा लग्नांमध्ये वर बराच प्रौढ व वधू अगदी कोवळ्या वयाची, असला प्रकार बराच आढळून येतो काय? अशा लग्नांपासून संतती कमी निपजते काय? किंवा निपजलेली संतती अल्पायुषी किंवा रोगट असते काय? अशा लग्नांमुळे कुटुंबात भांडणे वगैरे फार होतात काय? ज्या जमातींत अशी लग्ने होतात तेथे ही लग्ने करणे भाग असते का दुस-या कोणाशी लग्न केले तर चालते? अशी लग्ने होण्यास कोणती परिस्थिती कारणीभूत आहे, वगैरे प्रश्नांचा नीट, खोल व पूर्वग्रहविरहित अभ्यास झाला पाहिजे व मगच त्यावर पसंतीचे किंवा नापसंतीचे शिक्कामोर्तब करणे योग्य होईल. केवळ एक विशिष्ट रूढी आपल्याला अपरिचित, आपण पूज्य मानलेल्या धर्मग्रंथात न सांगितलेली, अतएव त्याज्य, असे तडकाफडकी ठरविणे हे कोत्या मनाचे व सामाजिक असहिष्णुतेचे लक्षण आहे.
 त्याचप्रमाणे हिंदूंच्या लग्नाबद्दल समितीची वृत्ती काही मुद्यांवर द्विधा आहे. कोणाही दोन हिंदूंत झालेले लग्न (१) त्यांपैकी कोणी वेडे नसेल तर, (२) पहिल्या लग्नाचा पति किंवा पत्नी हयात नसेल तर व (३) सापिण्ड्य नसेल तर कायदेशीर असावे, असे म्हटल्यावर वरील कलमांना विकल्प म्हणून खालील जादा कलमे दिली आहेत. १. दोन्ही विवाहेच्छू एका वर्णाचे (ब्राह्मण, वैश्य, शूद्र वगैरे) असावे व २. एका जातीचे असल्यास एका गोत्रप्रवराचे नसावे. ह्यापैकी पहिले वैयल्पिक कलम नवीन सुरू झालेल्या आंतरजातीय विवाहाविरुद्ध व वर्षसहस्रके चालत आलेल्या हिंदू धर्मावरील कलंकाची तरफदारी करणारे व