हे पान प्रमाणित केलेले आहे.
६ / आमची संस्कृती

तर लिहिलेल्या भाषेत अक्षरे येतात. ध्वनी व शब्द नाश पावतात, पण अक्षर न झरणारे, अक्षय असते अशी आपल्या पूर्वजांची कल्पना होती. पण अक्षर व ध्वनी ह्यांचा संबंध मात्र लिहिणारे व बोलणारे आहेत तोपर्यंत राहतो, एरवी नाही. आणि अक्षरे, ध्वनी व त्यांचा अर्थ हे त्रिकूट एका दृष्टीने कायम, तर एका दृष्टीने सदैव पालटणारे असे संस्कृतीचे एक प्रभावी साधन आहे.

 दृश्य व बुद्धिगम्य स्वरूपे
 संस्कृतीचे एक अंग दृश्य व हस्तग्राह्य असते. घरे, कपडेलते, खाण्या-पिण्याचे पदार्थ हे डोळ्यांनी दिसतात, हातांत धरता येतात किंवा चाचपून पाहता येतात जी व्यक्ती ह्या सर्वांचा उपभोग घेते ती क्वचितच त्यांची निर्माती असते. काही भाग मागील पिढ्यांनी निर्माण करून, वारसा हक्काने येतो- म्हणजे बापाकडून मुलाकडे जातो त्याप्रमाणे व्यक्तिगत वारशाने नव्हे- तर सामाजिक वारशाने येतो; तर काही इतर व्यक्तींच्या श्रमाने निर्माण होऊन देवघेवीच्या द्वारे आपणास मिळतो. व्यक्तीला स्वत:च्या शक्तीने जेवढे निर्माण करता आले असते त्याच्या कितीतरी पट जास्त वस्तूंचा उपयोग संस्कृतीच्या वारशाने त्याला मिळतो. हा मोठा फरक माणसांत व इतर सर्व प्राण्यांत असतो. इतर सर्व प्राणी स्वत:च्या श्रमाने मिळेल तेवढेच खातात, तेवढेच बांधतात माणूस पिढ्यानपिढ्यांच्या श्रमाचे खातो व उपभोगतो. मनुष्य भोवतालच्या सृष्टीतून आपल्या उपयोगाचे पदार्थ निर्माण करतो, ती कला इतरांना शिकवतो, ते पदार्थ इतरांना उपभोगास ठेवून जातो. मनुष्ये एकमेकांकडून नव्या कला शिकू शकतात. इतर प्राणी-जातीत प्रत्येक प्राणी तीच तीच कार्यं करीत असतो. माणसे मात्र विविध कार्यात गुंतलेली व असतात आपापल्या कृतींची देवघेव करून जीवनात विविधता व संपन्नता आणतात.
 संस्कृतीचे दुसरे अंग असे ज्ञानेंद्रियांच्या द्वारा दाखवण्यासारखे व पाहण्यासारखे नाही; ते बुद्धिगम्य आहे. हे अंग म्हणजे मनुष्याने सामाजिक जीवन जगण्याची बांधून दिलेली रीत होय. एकमेकांशी वागावे कसे, संघटित जीवन (कुटुंब म्हणून, जात म्हणून, राष्ट्र म्हणून) जगावे कसे,