पान:आमची संस्कृती.pdf/178

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / १७१

१४. आकांक्षा


 फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते मार्च संपेपर्यंत आणि मग एप्रिलचा शेवटचा आठवडा हे दिवस आले की मी अगदी बेचैन होते. सुदैवाने पुण्याच्या बाहेर दौ-यावर असले तर माझ्या मनाच्या यातना वाचतात, पण त्याला काही पळून जाता येत नाही. दरवर्षी त्याच दिवसांत त्याच कहाण्या, तेच अश्रू, तोच उद्वेग, तेच वैफल्याचे प्रदर्शन!- मन पिचून गेले तर नवल नाही. मी कंटाळलो, माझे परिश्रम व्यर्थ गेले, असे त्याला सारखे बोचत राहते. एका शिक्षकाच्या मनात असे विचार येतात ते काही विषय वाईट शिकवला म्हणून नव्हे, कामचुकारपणा केला म्हणून नव्हे, तर त्याहीपलीकडे जाऊन आयुष्यातील काही मूल्ये उराशी बाळगून ती मूल्ये इतरांच्या जीवनात उतरविण्याचा केलेला खटाटोप व्यर्थ जातो म्हणून.
 फेब्रुवारीत चाचणी परीक्षेचा निकाल लागतो व त्यात पास होणाच्या म्हणजे सर्व विषयांत पास आणि फक्त एका विषयात नापास होणाच्या विद्यार्थ्यांना विद्यालयीन परीक्षेस बसण्याची परवानगी मिळते. हा निकाल लागल्यापासून घरी वर्दळ सुरू होते. त्यांत नापास विद्यार्थी, त्यांचे आईवडील व इतर मित्रमंडळी सर्व असतात. सर्वांचे म्हणणे एकच- मूल नापास झाले असले तरी कृपा करा व परीक्षेस बसण्याची परवानगी द्या.