पान:आमची संस्कृती.pdf/185

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७८ / आमची संस्कृती

प्रकाराची त्याच्याजवळ चर्चा केली. झाली गोष्ट वाईट झाली, आपल्या हातून होऊ नये ते झाले, ह्याची जाणीव त्याला झालेली दिसली नाही. त्याच्या मते त्याचे वर्ष फुकट गेले ते त्याला परत मिळावे. सर्वच विषय अतिशय कच्चे होते तो पास होणे शक्यच नव्हते. तेव्हा पुढे नीट अभ्यास करा- पोटासाठी काही व्यवस्था हवी असल्यास आपण बघू. ज्या आईबापांनी तुम्हांला इतके वाढवले त्यांच्या श्रमांचा मोबदला आत्मघात हाच का? जगात पहिले अपयश आले की अशी कच खाऊन कसे चालेल? आपल्या हातून वाईट वर्तन झाले तर शिक्षा भोगण्याची तयारी नको का? - एक ना दोन परोपरीने किती सांगितले, तरी त्याचे आपले एकच उत्तर-- माझे वर्ष फुकट गेले! अती खोदून विचारले तर काय म्हणे, “बरं सर, झाली चूक तर क्षमा करा व पुढच्या वर्गात घाला." सर म्हणतातच आहेत तर करा चूक कबूल, पाहावे त्याने वळले तर, अशी ही भूमिका होती. त्याच्या वडिलांना सर्व हकीगत कळवून मुलावर नजर ठेवण्यास सांगितले. त्यांचे उत्तरच आलं नाही. मुलगा सहा महिने आत्महत्येची पत्रे लिहीत होता. पुढे काय झाले कोण जाणे!
 आत्महत्येची पत्रे
 आणखी अशीच हकीगत आठवते. हा मुलगा मॅट्रिक परीक्षेपासूनच रागावलेला होता. त्याच्या मताने तो फर्स्ट क्लासात यावयास हवा होता, पण आला सेकंड क्लासात! कॉलेजातील पहिल्या वर्षातही कोणत्याही परीक्षेत सर्व विषयांत पास झालेला नाही. वार्षिकच्या वेळी घरातल्या माणसांना सांगितले, की सर्व पेपर उत्तम गेलेले; फक्त गणिताच्या पेपरचा एक भाग तेवढा वाईट गेलेला. रिझल्ट लागायच्या आधी ह्या मुलान आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. का- तर वडील वृद्धपणी काम करून फीचे पैसे भरतात. आपण तर नापास होणार; त्यापेक्षा वडिलांना भार नका म्हणून मरूनच जावे! बिचारी बहीण आजारी असतानाही धडपडत येऊन माझ्या भावाला पास करा म्हणून याचना करून घाईघाईने गेली. कारण भाऊ जिवाचे काही बरेवाईट करील म्हणून त्याच्यावर पहारा ठेवायला दृवा. मला वाटले की, एखाद्या पेपरचा थोडा भाग कठीण गेला म्हणून घाबरण्याचे कारण नाही. पहिल्या वर्षाचे रिझल्ट बरेच सौम्य लागतात;