हे पान प्रमाणित केलेले आहे.

२४ / आमची संस्कृती

एकमेकांच्या अगदी सान्निध्यातही ती अस्तित्वात असतात.

 लोकबीजेही (Folk-elements) हिंदुस्थानात स्थानभ्रष्ट झालेली दिसून येत नाहीत. जंगलात राहणाऱ्या टोळ्या अजूनही बऱ्याच अंशी आपापली जंगले राखून आहे तसे दिसते. मोठमोठ्या नद्यांच्या खोऱ्यांत शेती करून राहणारे लोक भटक्या टोळ्यांच्या आक्रमणापुढे पळून गेलेले आढळतात. परंतु हल्लेखोरांचा जोर ओसरला म्हणजे ते पुन्हा आपल्या पूर्वजांच्या वास्तूत परत आलेले आहेत. पुष्कळदा असेही दिसून येते की, आधीचे जेते असलेले हे भटके आक्रमक लोक आज काहीशा हीन व खालच्या पायरीवर आहेत; आणि त्यांच्या आधीच्या थरांतील कुशल कृषिवलांनी टाकून दिलेल्या पडीक व नापीक प्रदेशांत ते वस्ती करून राहिले आहेत. दिल्लीच्या आसपास आढळणारे गुजर लोक या प्रकारचे होत. एका वेळी मोठे आक्रमण करून स्वत:चे वर्चस्व स्थापित करणारे हे गुजर शेवटी अशा अवस्थेला पोचले की, एका दंतकथेत त्यांना उजाडगावात राहणाऱ्यांपेक्षाही हीन समजले गेले आहे. दिल्लीच्या एका बादशहाला असा शाप कोणी दिल्याची दंतकथा आहे की, तुझी राजधानी उध्वस्त होईल. 'या रहे उजर, या रहे गुजर.'
 हिंदुस्थानातील अनेक दैवतवादाशी इतरत्र फोफावलेल्या ख्रिस्ती व महंमदी एकेश्वरवादाची तुलना करून पाहण्याजोगी आहे. ईश्वर एकच आहे आणि अमुक अमुक हा त्याचा एकमेव प्रेषित आहे असे प्रतिपादणाच्या या पंथांचे जे प्रचारक असत, ते पूर्वीच्या संस्कृतीच्या खाणाखुणाही राहू न देता तिला समूळ नाहीशी करण्याची पराकाष्ठा करीत असत. आपल्या पंथाची प्रस्थापना होण्यासाठी पूर्वीच्या पंथाचा उच्छेद होणेच त्यांस आवश्यक वाटत असे. तडजोड किंवा जमवून घेणे यांस तेथे वावच नव्हता; एक तर तुम्ही तरी राहा नाही तर आम्ही तरी राहू, असा उकेरीवरचा प्रकार असे. अर्थातच अशा एकेरीपणाच्या पंथप्रसारासाठी कित्येकदा शस्त्रबळाचा, बळजोरीचा आश्रय केला तर त्यांत आश्चर्य काय! पूर्वीच्या संस्कृतीचा लवलेशही शिल्लक राहू नये यासाठी हे नवीन पंथाचे प्रसारक किती दक्ष असत याचे एक उदाहरण पाहण्याजोगे आहे. आपल्याकडे ज्याप्रमाणे अश्वमेध करून मग त्यानंतर या यज्ञीय अश्वाचे मांस प्रसाद म्हणून भक्षण करण्याची चाल होती, त्याप्रमाणेच कमीअधिक