हे पान प्रमाणित केलेले आहे.

३४ / आमची संस्कृती

स्त्रीशिक्षण, बेताची मुले असलेली सुटसुटीत नागरी कुटुंबे व स्त्रियांना मिळणारा थोडाबहुत रिकामपणा यांमुळे स्त्रिया सार्वजनिक आयुष्यात पुष्कळच वाटा मिळवू लागल्या, आपली खरी व काल्पनिक दु:खे वेशीवर टांगू लागल्या व नवर्‍याच्या बाहेरील नोकरीमुळे मुलांवर सत्ता गाजवू लागल्या. भारतातील स्त्रियांनी तरी एखादा वार्षिक उपास वा सण करून या क्रांतीची आठवण ठेवावी एवढे मोठे इंग्रजी राजसत्तेचे ऋण त्यांच्या डोक्यावर आहे. जी बाब स्त्रियांची तीच खालच्या समजल्या जाणा-या जातींची, विशेषत: अस्पृश्यांची. इंग्रजांनी शाळा, आगगाडी, आगबोट, रस्ते वगैरे सार्वजनिक ठिकाणी शक्य तोवर सर्व जातींना सारखे लेखले. अस्पृश्यांना स्वत:ची, व स्पृश्यांना अस्पृश्यांच्या मानवतेची जाणीव इंग्रजांनी पहिल्याने दिली यांत मुळीच संदेह नाही. राजसत्तेच्या दृष्टीने व धर्मप्रसारकांच्या दृष्टीने ब्राह्मणांचे वर्चस्व कमी करणे इंग्रजांना इष्ट होते; व जरी इंग्रजी शिक्षणाच्याद्वारे ब्राह्मणांची आर्थिक स्थिती सुधारली, तरी भूदेव म्हणून त्यांचे समाजातील वर्चस्व कायम नाहीसे झाले. जन्मजात श्रेष्ठकनिष्ठपणा जाऊन ज्याच्याजवळ पैसा तो श्रेष्ठ ही यंत्रयुगीन विचारसरणी हळूहळू हिंदी लोकांत रुजू लागली आहे. जात्यधिष्ठित समाजधारणा अजून गेली नाही, पण तिचा पाया डळमळला एवढे खरे. कोणी म्हणतील की ही सर्व स्थित्यंतरे यंत्रयुगाची निदर्शक आहेत. इंग्रज नसते तरी जे व्हायचे ते झालेच असते, इंग्रज हे नुसते निमित्त होते. खरे कारण यंत्रयुगच होते. पण यंत्रयुगाशी आमची ओळख इंग्रजांमुळेच झाली व आमची आजची सामाजिक परिस्थिती हा इंग्रजी यंत्रयुगीन संस्कृती व भारतीय संस्कृती यांच्या संघर्षामुळे झालेला यंत्रयुगाचा विशिष्ट आविष्कार आहे हे विसरून कसे चालेल? परकी सत्ताधाऱ्यांनी इंग्रजी भाषेचे शिक्षण दिले तेव्हा भारतीयांना एका नवीनच संस्कृतीचे दर्शन झाले. या संस्कृतीची तुरीचशी अंगे भारतीयांना पटणारी नव्हती, पण मुख्यत: वाङ्मय व शास्त्र यांचे दर्शन दिपवून टाकणारे होते. इंग्रजांचा अखंड स्वातंत्र्याचा हजार वर्षांचा इतिहास, प्रत्येक शतकांमधील त्यांची उज्ज्वल वाङ्मयनिर्मिती, भूगोलावरील त्यांचे आक्रमण व अर्वाचीन शास्त्रांतील त्यांची आश्चर्यकारक कामगिरी यांनी भारतीयांना भारून टाकले. इंग्रजांचे ललित वाङ्मय जसे हृद्य तसेच शास्त्रीय वाङ्यही मूलग्राही, सुलभ व अतिशय