हे पान प्रमाणित केलेले आहे.

३८ / आमची संस्कृती

नियोजन असावे की नाही? सर्वांना धान्य पुरेल इतके पिकत नाही; अशा परिस्थितीत धान्यवाटप व नियोजन असावे की नाही? न्याय व पोलिसखाते यांची फारकत व्हावी की नाही? एकीकडून सर्वस्वी केंद्रित सत्तेबद्दल बोलून लगेच सर्वस्वी स्वयंपूर्ण खेड्यांची गोष्ट कशी काढता येईल? Secular state म्हणजे काय? राष्ट्रांतील अधिकाऱ्यांनी जाग-जागी गांधीजींचे केलेले रक्षाविसर्जन, गव्हर्नर जनरलांनी बिर्ला मंदिरात (लक्ष्मीनारायण मंदिर) केलेली प्रार्थना ही Secular state शी सुसंगत आहेत का? हिंदू म्हणून घेतल्याने राज्यकारभारात कोणता फरक पडेल?
 अशा परिस्थितीत इंग्रजांनी गेल्या शंभर वर्षांत आम्हांला काय दिले हा प्रश्न नसून, आमच्या समाजाची धारण करण्यापुरते काही ठेवले आहे का? सांस्कृतिकदृष्ट्या आम्ही परत स्वतंत्र होण्याची काही आशा आहे का? हे अगदी निकडीचे प्रश्न आपणांपुढे आहेत. इंग्रजांच्या शंभर वर्षांच्या अमदानीत आमची जुनी समाजव्यवस्था पार नाहीशी झाली नाही. जुन्या समाजव्यवस्थेचे बाह्य स्वरूप, बऱ्याच बाबतीत टिकून आहे, पण ती जीव नसलेला पोकळ कोबा आहे. आम्हांला जे हवे ते नवे अर्थशास्त्र, नवं राज्यतंत्र, नवे विज्ञान हे नसून नवे समाजशास्त्र हवे आहे. ते आले व जीवनाची मूल्ये काय, हे ठरले म्हणजे बाकीची सामाजिक जीवनाची क्षेत्र आपोआपच निश्चित रूप घेतील. नवे समाजशास्त्र होईल ते आपल्या सांस्कृतिक परंपरेचे स्मरण ठेवून होईल की केवळ पाश्चात्याच्या अनुकरणाने होईल, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तीन हजार वर्षांच्या अखंडित संस्कृतीचे आम्ही वारस आहोत. ती संस्कृती लवचिक, प्रगमनशील व काळाप्रमाणे बदलणारी आहे. तिच्यात साचलेल्या घाणीबरोबर अविनाशी मूल्ये आहेत. घाण टाकून, ती मूल्ये पाखडून घेतली तर समाजधारणा होईल. त्यांत आपल्या संस्कृतीचे स्वतंत्र रूपएका मानवतेचे दिक्कालांतर्गत झालेले विशिष्ट दर्शन- कायम राहून तो नव्याने फोफावेल, व व्यक्तीच्या व राष्ट्राच्या जीवनातील अगतिकता जान आपण परत सर्व दिशांनी संपन्न होऊ; नाहीतर कोणत्या ना कोणत्या तरी पाश्चिमात्य राष्ट्राचा उपग्रह म्हणून भ्रमण आपल्या नशिबा येईल.

- १९४८