हे पान प्रमाणित केलेले आहे.

६४ / आमची संस्कृती





 ६.सामाजिक स्थित्यंतर घडविण्यातील व्यक्तींचे कार्य


 आगरकरांच्या शताब्दीनिमित्त मला बोलावून माझा जो गौरव केला त्याबद्दल आजच्या सभेच्या चालकांचे आभार मानण्याच्या वेळीच,पुण्यात स्त्री म्हणून मला जे शिक्षण मिळाले, वारंवार उत्तेजन मिळाले व आज तुम्हांपुढे उभे राहावयास मिळाले त्यांचे श्रेय बहुतांशी आगरकरांच्या प्रयत्नांना आहे. म्हणून त्यांच्या ऋणाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करून,त्यांच्या स्मृतीला आदरपूर्वक श्रद्धांजली वाहून मगच मला काय सांगायचे ते थोडक्यात सांगते.
 आगरकरांचे निबंध वाचल्याला मला पुष्कळ वर्षे लोटली. ह्या वर्षी ते परत हातात घेऊन वाचले. त्यांची विविधता, त्यांतील शुद्ध बालबोध भाषा, त्यांतील ओज, त्यांतील तळमळ, प्रत्येक निबंधातून प्रत्ययास येणारी सत्यप्रियता, निर्भीडपणा व आठवड्यामागून आठवडे,महिन्यामागून महिने, वर्षांमागून वर्षे, लोकनिंदा व उपहास सहन करून लिहिण्यास लागणारी प्रखर कर्तव्यबुद्धी ह्यांची प्रतीती येऊन मन आश्रयचकित झाले, आनंदाने पोट भरून गेले व त्याच वेळी आजच्या महाराष्ट्रातील दुर्दशा मनात येऊन अतोनात खिन्नता वाटली.

 गुलामी मनोवृत्ती आजही कायम
 काही काही सुधारणांबद्दलचा अट्टाहास आज अतिरेकी वाटेल: