पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/२७

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 शिवापुरात राहणाऱ्या जिजामाता बचत गटाच्या शकुंतला वनशीव गावात भरलेल्या ५० जणींच्या महिला मेळाव्यात सांगत होत्या.
 'चार जणीत बोलायचं म्हणजे धडधडतं' असं आपल्या पैकी किती जणींना होतं, मग वनशिवबाईंना एवढं धिटाईनं बोलायला कसं काय जमलं?
 वनशिवबाई सांगतात, 'गटानं मला बळ दिलं.'
 गटानं बळ दिलं म्हणजे काय? कसं काय मिळालं ते वनशिवबाईंना?
 "धंद्यासाठी माझे मालक या गावी इकडे आले. अन् त्यांनी धंदा सुरू केला. आमची ना शेती-वाडी, ना घरचं दुसरं कोणी कमावणारं. पोरं लहान अन तशात आमी खालच्या जातीचं. गरिबी येवढी, का कुनाकडून १० रू. उसनं आणायची सुद्धा हिंमत नव्हती अन ऐपत बी! असल्या परिस्थितीत कसची बचत नि कसचं काय?
 माझं कुणाकडच येणं-जाणं न्हवतं. घराबाहेर तशी पडतच न्हवते. शेजारणीनं आग्रह धरला, म्हणून येका बैठकीला गेले. तशी मनातून हिंमत नव्हतीच पन बघितलं तर माझ्या सारख्या परस्थितीतल्या महिला पन आल्या होत्या. ताईंनी गटाचे सगळे नियम समजून दिले, त्यामुळे थोडा विश्वास यायला लागला. यरवी आम्हाला उचल कोण देणार? पण गटात आल्यावर कळलं, की गटातून कोणती पण नियमितपणे येणारी महिला उचल घेऊ शकते. आमच्या धंद्यामध्ये तर उचल घ्यायची फार गरज होती. पहिली उचल घेतली. २०००रुपयांची. आमच्या गटात समजूत चांगली. अडवणूक कोणीच केली नाही. गटाचा आधार नसता, तर मालकांच्या धंद्यात ऐवढी मदत करता आली नसती, त्याचबरोबर मग घरात गॅस घेतला, नवीन पलंग केला, स्वतःसाठी गंठण केलं. मी गटात गेले म्हणून धंद्याला हक्काचा आधार मिळाला. म्हणून तर बचतीचा हप्ता घरच्याकडून हक्कानं मागून घेते."

तुम्ही बी घडाना ॥            २१