पान:आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना (Amhi Bi Ghadalo Tumhi Bi Ghadana).pdf/५५

हे पान प्रमाणित केलेले आहे.

करता दुसऱ्याला मदत करायला पायजे असं त्यांना सारखं वाटायचं. त्यांच्या मालकांनी पण साथ दिली. म्हणून मग लेप्रसी टेक्निशिअनचा ४० दिवसांचा कोर्स केला आणि आरोग्य सेविकेचं काम करायला सुरूवात केली.
  म्हणजे, त्यांनी मदत करायची संधी शोधली. मनात होतं, ते प्रत्यक्षात आणायची धडपड केली. म्हणूनच पंचायतीत काम करण्याची संधी पण चालत आली. गेली २०-२५ वर्ष पंचायतीत बिनविरोध निवडून येत होत्या.
 खरं तर आरोग्य सेविकेचं काम, पंचायतीतलं काम यातून शांताबाईंनी कितीतरी लोकांना मदत केली होती. पोस्टाची बचतीची खाती उघडायला लावून बचतीचं वळणसुद्धा लावलं होतं. तरी बचत गटाची वेगळी जबाबदारी त्यांनी घेतली.
 त्या सांगत होत्या "बचत गटाची ताकदच येगळी. सारं करत होते पण आधी कुणाची पैशाची नड मला भागवता येत नव्हती. गावात बचत गट सुरू झालं, अन् नड कशी भागवायची, हे बायांना शिकवायचा रस्ता दिसला. त्यातून गटाचं येगळंपण असं, की गटामधी पैसा खेळता राहतो आणि सगळा पैसा बायांच्याच हातात रहातो. गटाच्या बायामान्सांना उपेग होतो."
 "आमच्या भागात पूर्वी सावकारी फार ! महिन्याला १०% नंउचल घ्यायला लागायची. त्यापायी कितीकांच्या जमिनी गहाण पडल्या. आता गटामधून लहान मोठी उचल मिळाया लागली.त्यामुळं गावातली सावकारी कमी झाली. बायांनी स्वत: च्या नावावर घरासाठी काय-काय घेतलं! कुणी घरावर पत्रे घालून घेतले, कुणी घरात गॅसच्या शेगड्या तर कुणी कुकर घेतला. त्यातून बायामाणसांचे कष्ट कमी झाले, अन् घरादाराला मदत व्हायला लागल्यामुळं घरातला मान वाढला, बाईच्या शब्दाला
तुम्ही बी घडाना ॥               ४९