पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८७
ऐशी वातविकार.

 लक्षण. १४ पांगुल्य-पांगळेपणा. सर्व पायांतील स्नायु निष्क्रिय होणे. याचे दोन प्रकार संभवणारे असतात. एक पायांत रक्ताचें अभिसरण न झाल्याने कोरडेपणा येऊन, व दुसरा प्रकार म्हणजे या स्नायूंची संवेदनशक्तीच नाश पावणे. १५ गुदभ्रंश-गुदद्वारामध्ये मळाचे विसर्जन झाल्यावर गुदद्वाराचे आकुंचन स्वाभाविकपणेच ज्या स्नायूंमुळे होते. त्यांमध्ये अशक्तपणा येऊन गुदवली-गुदद्वारांतील मृदुत्वचेच्या वळकट्या ढिल्या होऊन त्या गुदद्वाराबाहेर पडतात. व त्यांचे आकर्षण करणारे स्नायु ढिले झाले असल्याने त्या आंत खेचल्या जात नाहींत. पुष्कळ जुलाब होणें किंवा कुंथणे यांमुळे या स्नायूंची शक्ति अव्यवस्थित रांतीने खर्च होऊन ती नाश पावते. १६ गुदार्ति - गुदद्वाराला ठणक लागणे. गुदद्वाराचे त्वचेत कोरडेपणा आल्याने ठणका लागतो. १७ वृपणोत्क्षेप-वृषणग्रंथि-वर म्हणजे जघनास्थी किंवा भगास्थीकडे ओढल्या जाणे. यालाहि स्नायुसंकोच हेच कारण असतें. वृषणग्रंथी व तेथील स्नायु यांमध्ये मेदाचे एक विशिष्ट प्रमाण असून त्यामुळे या ग्रंथींचे चलन, खाली वर होणे, होत असतें. त्या मेदाचें क्षीणतमुळे वृषणाचे ऊर्ध्वाकर्षण होते. १८ शेफस्तंभ--शिस्न स्तब्ध होणें-चेतनारहित होणें- येथील ज्ञानतंतूंमध्ये विशिष्ट प्रकारची उत्तेजक संवेदना असते. आणि या पेशीमय अवयवामध्ये पेशींची स्निग्धता राखणाऱ्या मेदाच्या योग्य मर्यादेतच चेतनेचे अस्तित्व कायम राहतें. फाजील व अव्यवस्थितपणें चेतनेचा व्यय झाला असतां ती नाश पावावी हैं स्वाभाविक आहे. १९ वंक्षणानाह-- वंक्षण हागजे ओटीपोट किंवा अंडसंधि या नांवांनी संबोधला जाणारा भाग होय. श्रोणिमंडलाचा पुढील भाग कांहीं प्रमाणांत पोकळ असून अपानवायूच्या क्रिया किंवा अधोभागांतील उत्सर्जनेंद्रियांचीं कामें या पोकळीतील वायूमुळे होतात याचा उल्लेख मागे केला आहेच. ज्यावेळी ह्या वायूचे प्रमाण वाढतें, त्यावेळीं तो या पोकळींत वाढून वरील त्वचेला ताण बसतो व आंतील उत्सर्जक इंद्रियांचे क्रियांमध्ये विकृति उत्पन्न होते. २० श्रोणिभेद व्यावहारिक भाषेत कमरेला फूट लागणे किंवा कमर फुटणे या नांवानें या लक्षणाचा उल्लेख करितात. जानुभेदाप्रमाणे यांतहि श्लेषक कफाची क्षीणता है कारण असते शिवाय अस्थीतील मज्जा धातूंत क्षीणता उत्पन्न झाली असतां अस्थींमध्ये रुक्षता आणि काठिन्य उत्पन्न होऊन ठणकणे हे कोणत्याहि हाडांचे ठणक्याचें सामान्य कारण असतें. २१ विडभेद-म्हणजे मळ पातळ होणे. मळ पातळ होणें या लक्षणाचा वातविकारांत समावेश होऊं शकत नाहीं. वायूमध्ये असा कोणताहि गुण नाहीं कीं त्यामुळे अगदी अल्प प्रमाणांत का होईना, पण मळांत पातळपणा उत्पन्न व्हावा ! उलट मळांत घट्टपणा आणणे हे मात्र वायूचे प्रमुख