पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९५
वातविकार संसर्गजन्य असतात.

 आणि संकोच उत्पन्न करून सर्व पक्वाशयाची स्रोतसें रुक्ष करून व त्यांची उत्सर्जनशक्ति कमी करून त्यायोगें वायु सरण्याचें बंद झालें ह्मणजे वरील विकार होतात वायूला शरिरांतील स्रोतसांचे खुलेपणाची अत्यंत अवश्यकता व इतर पदार्थांचे अत्यल्प वाढीनेहि या स्रोतसांमध्ये थोडाफार संकोच अथवा प्रतिबंध उत्पन्न झाला की वायूला अडथळा उत्पन्न होतो. व वायूचा स्वभावच संचारशीलता असल्याने अडथळ्याचा प्रतिकार तत्काल सुरू होतो. यामुळे वातविकारांमध्ये बरेच विकार संसृष्टवायूचे असतात. विशेषतः ज्या विकारामध्ये वायूच्या नित्य क्रिया कमी झालेल्या असतात ( स्पर्शज्ञान कमी होणें, रुचि कमी होणें, मलोत्सर्जन कमी होणें, हात, पाय वगैरेंचें चलनवलन कमी होणे इत्यादि.) त्यांमध्ये रोगाचें कर्तृत्व बहुधा वाढलेल्या वायूकडे नसून, वाढलेल्या कफाकडे असतें. याचे वाढीने प्रमाणांत किंवा कमीहि असलेल्या वायूच्या क्रिया कमी घडतात. स्पर्शनेंद्रिय किंवा त्वचा यांमध्ये नित्यापेक्षां स्पर्शज्ञान कमी होतें. त्यावेळीं ही वायूची क्रिया कमी होण्याचे कारण, वाढलेल्या कफामुळे अधिक स्निग्ध, चिकट, घन, शीत असा रसधातु शरिरांत पसरणे, अधिक घन पदार्थांनी स्पर्शेद्रियांतील सूक्ष्म स्रोतसांचा अवरोध होणे व या कारणांनी स्पर्शज्ञान कमी होणें. अशी ही कारणपरंपरा असतें; पण अशा वेळीं कारण मात्र वायूची वाढ असत नाहीं. एकाद्या संधिभागांत सूज येऊन तीमुळे स्नायूंची व पेशींची हालचाल नीट होईना, व त्यामुळे त्या भागाचें चलनवलनहि विकृत झाले; ठणकाहि आहे, ठणका वायूचा व चलनाचे वायुच्या क्रियांत विकृति, परंतु कारण मात्र संचित पदार्थ ( सुजलेल्या आंगांतील ) असतो. असल्या प्रकारच्या रोगांवर उपचारहि वातनाशक नसून वातानुलोमक ह्मणजे वायूचे मार्गांत आणि क्रियांत विघ्न उत्पन्न करणाऱ्या पदार्थाची अडचण दूर करणे असेच असतात, वायुचे विकारांपैकी एक प्रकार मात्र असा संभवतो की, त्यांत कारण वायूचीहि वाढ नाहीं आणि इतर एकाद्या दोषाची अथवा धातूचीहि नाहीं. तर ज्या संवेदनाशक्तीच्या आद्यप्रेरणेमुळे शरीरावयव किंवा शरीरघटक कार्यक्षम होतात तिची क्षीणता हैं कारण असतें. एकाद्या अथवा सर्व शरिराची संवेदनाशक्तीच जर कमी झाली तर तीमुळे उत्तेजित होणाऱ्या सर्व स्नायूंची हालचाल मंदावते. आणि हालचाल कमी झाली कीं सर्व क्रिया मंदावतात, अभिसरण कमी होतें, एकाद्या जागीं फाजील संचय होतो; संचय झाल्यावर त्याचे पुढील सुजणें, कुजणें, इत्यादि प्रकार होतात. असा एक प्रकार ध्यानीं घेण्यासारखा असून बहुधा हा इंद्रियनाश या सदरांत येणारा व असाध्य असतो. बाकीचे वातविकारांमध्ये त्याचे कार्यांत व मार्गांत व्यत्यय हें मुख्य कारण असते. वायूचे क्रियांचा अधिक परिणामहि रोगच