पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१०९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९६
आयुर्वेदातील मूलतत्वें.

 असतो. जसे अधिक बोलणें- बडबड, अधिक चालणे, धावपळ, हातवारे करणे इत्यादि फाजील व्यापार हे वायूचे विकारच असून ते त्रासदायकहि असतात. पण यांतहि सूक्ष्मदृष्टया विचार केला असतां, वायूची वाढ नसून त्याचा कोप अथवा उन्मार्गगामिता असते असे दिसून येईल. सर्व शरिरांत वायूची वाढ तत्वतः व्हावयाची म्हणजे धातुक्षीणता यावयास पाहिजे. आणि धातुक्षीण झालेल्या क्षीण शरिरामध्ये योग्य क्रिया कोठून व्हावयाच्या ? यासाठीच वातविकारांचे गणनेमध्ये स्वतंत्र वातविकारांचा उल्लेख कमी असतो. वायूचा हा विशेष दाखविण्यासाठी वायू योगवाही म्हणजे संयोगानुरूप कार्य करणारा आहे असे त्याचे वर्णन आहे.

योगवाहः परं वायुः संयोगादुभयार्थकृत् ॥
दाहकृत्तेजसा युक्तः शातकृत्सोमसंश्रयात् ॥ १॥ ( चरक )

 वायु हा योगवाही असून तो पित्ताशी मिश्र झाला असतां दाहकारी, व कफाशीं संयुक्त झाला असतां शीतोत्पादक होतो. या वायूचे वर्णनाचा तात्विक आशय असाच आहे कीं, शुद्ध स्थितींत वाढलेल्या वायूचीं लक्षणें रोगोत्पादक नसून वायूचा इतर दोषांशी संयोग झाला असतां तो रोगकारी होतो. व यांचेच विकारांत इतर दोषांचीं दर्शक लक्षणे असतात. याचेच स्पष्टीकरण वायूचे आवरणांच्या अनेक प्रकारांनी केले आहे.

वायोरावरणं चातो बहुभेदं प्रवक्ष्यते ॥

( अ. ह. नि. स्था. अ. १६ )


 वायूचें अनेक प्रकारचें आवरण म्हणजे संयोग सांगतो. अशी प्रस्तावना करून एकंदर बावीस प्रकार सांगितले आहेत.

( इति द्वाविंशतिविधं वायोरावरणं विदुः ॥ )

 या आवरणांचा बोध वायूचे ज्ञानाला बराच मदतगार होणारा आहे. आवरणाचे प्रकार येणेप्रमाणे:--

आवृत किंवा प्रतिबंध पावलेल्या वायूचीं लक्षणें.

 १ पित्तावृत वायु-लक्षणे :- दाह, तहान, शूल, भ्रम, अंधारी येणें, तिखट, उष्ण, अम्ल व खारट या पदार्थांनीं जळजळ - दाह-होणें आणि थंड पदार्थांची इच्छा होणे.
 २ कफावृत वायु-लक्षणः- शीतता ( थंडी वाजणें ) जडपणा, वर सांगितलेल्या तिखट वगैरे पदार्थांनीं आराम वाटणें, उपवास, व्यायाम, रूक्ष व उष्ण पदार्थ यांची इच्छा होणें.