पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/११८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०५
रोगप्रतीकारी सामर्थ्य कोठून उत्पन्न होतें ?

 किंवा विकृति म्हणतां येईल. उदाहरण--एकाद्या भागांत आलेली सूज. ज्या भागांत सूज आली तेथे अधिक द्रव्याचा संग्रह झाला हे अगदीं उघड आहे. सुजेविषयीं सामान्य लक्षण सांगतांना कोठे तरी (स्थाना- नुरूप) निचय - संचय होतो असें सांगितलें आहे.

उत्सेधं संहतं शोथं तमाहुर्निचयादतः ॥

 आणि सूज अधिक संग्रहाने होते याचेच स्पष्टीकरण-सूज कफावांचून नाहीं. " शोफः कफोदयात् । ऋते न ” या वाक्यानें केलें आहे. त्वचा मांस व अर्थात् त्यांमधील शिरा, स्नायु, रुधिर यांत संग्रह अधिक झाला म्हणजे संचय होतो, संचयाला सूज म्हणतात. केवळ संग्रह आहे तोपर्यंत सूज कफाचीच आहे. आणि कफाची लक्षणे जडता, स्निग्धता, स्थिरता इत्यादि सुजेत असतात. परंतु कांहीं कालाने सुजल्या भागांत संचित झालेले रक्त वगैरे अभिसरणाचे अभावी कुजू लागते. कोणताहि पदार्थ एकाद्या जागीं अनैसर्गिक रीतीनें संचित झाला की त्याचे पचनहि अनैसर्गिक रीतीनेच होतें व नंतर उत्सर्जनामध्येहि अनैसर्गिकपणा असतो. आणि जेथे हे व्यापार चालतात त्याजागी अनैसर्गिक अशा वेदना उत्पन्न होतात. व त्यांनाच रोग असे म्हणतात. असो. संचित द्रव्य कुजूं लागलें कीं त्या स्थितीमध्ये एक प्रकारची उष्णता उत्पन्न होते. कुजणें म्हणजे पचन किंवा पृथक्करण होय शरिराच्या अविकृत भागांतून दूषित असलेले पदार्थ पृथक् करणे यासाठी निसर्गाच्या योजनेने त्या भागांत पचन सुरू होतें नेहमींचे पचनाहून हे कार्य हैं अधिक प्रमाणांत व्हावयाचे असल्याने इतकी अधिक पाचकशक्ति येथे कोठून येते हा एक महत्वाचा प्रश्न आहे. वास्तविक पाहतां ज्यावेळीं रोगाची आरंभावस्था होती म्हणजे रोगस्थान विशेष दूषित झालें नव्हतें, तेथील पचनशक्तीवर फार बोजा पडला नव्हता अशा वेळीं जी पचनशक्ती रोगकारक द्रव्याला प्रतिकार करूं शकली नाहीं तिचा उपयोग रोगाची पूर्ण वाढ झाली, रोगकारक द्रव्याचा संग्रह भरपूर झाला अशा वेळी व्हावा हें आश्चर्य नाहीं काय ? अशी शंका स्वाभाविक असून तिचें समाधान करण्याला अनुभवसिद्ध तर्काशिवाय दुसरें साधन नाही. याविषयीं तीन प्रकारचे तर्क संभवणारे आहेत. ते येणेप्रमाणेः--

रोगप्रतीकारी सामर्थ्य कोठून उत्पन्न होते ?

 १ ज्या वेळी एखाद्या ठिकाणी रोगकारक द्रव्यांचा संचय होऊन त्रास पीडा वेदना अधिक होऊं लागतात त्यावेळी तेथील ज्ञानतंतूंच कार्य वाढते व स्वाभाविकपणेच सर्व शरीरांतील ज्ञानतंतूंचे कार्य कमी होऊन रोगी भागांत सर्व शक्ति एकवटतात. एकाद्या भागांत अस्वाभाविक झालेला हल्ला परतविण्यासाठी सर्व शरीरांतील सामर्थ्य त्या भागांत