पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०९
संन्निपात.

 आली असतां इतरांवर त्या विकृतीचा परिणाम व्हावयाचाच. संसर्गामध्ये सुजचे उदाहरणांत विसर्ग आणि आदान किंवा पोषण आणि शोषण, संग्रह आणि पचन यांविषयींचा क्रम सांगितला आहेच. अतिरिक्त द्रव्याचा संग्रह होऊन त्याचे पचन, पृथक्करण होईनासे झाल्यावर त्या भागांत रुधिराभिसरण व धातूंची देवघेवहि होईनाशी होते. पण सुजलेल्या भागांतील स्पर्शसंवेदनाहि कमी होतात. यावरून दोन विकृत क्रियांचा परिणाम तिसऱ्या वियोजन किंवा उत्सर्जन या क्रियेवर होत असल्याचें उघड होतें. असा होत असलेला परिणाम संसर्गाप्रमाणे संनिपातहि नाहीं. संनिपात ही अवस्था ह्मणजे एकदम तीनहि क्रिया विकृत होणें. सुजेचेंच उदाहरण घ्यावयाचे तर एकाद्या विषारी प्राण्याचे दंशाने सूज आली त्यावेळीं पूर्वी कांहींच विकार नव्हता पण दंशांतून विषाचा प्रवेश होतांच त्याचा दंशाचे जागीं असा परिणाम झाला कीं, रुधिराभिसरण बंद झालें, तें बंद झालें यामुळे सूजहि आली, दाह होतो, म्हणजे विषाचा प्रवेश होतांच सर्व क्रिया एकदम विकृत झाल्या. मग या विकृतीचें उत्पादक दंशविष दाहक असेल तर दाह अधिक होईल, विषारी जात शीतवीर्य असेल तर शीतता स्तंभ इत्यादि लक्षण अधिक असतील. परंतु एकसमयावच्छेदाने विषयुक्त भागाचें पोषण, पचन आणि उत्सर्जन यामध्यें विकृतपणा येणार ही गोष्ट अगदीं उघड आहे. आणि असल्या वैषम्यालाच, संनिपातिक विकृति नांव आहे. ज्याप्रमाणे बाह्य विषारी पदार्थोनें एकाद्या ठिकाणी अशा प्रकारची संनिपातिक विकृति उत्पन्न होते त्याच प्रमाणे शरीरांतच आहारादिकांच्या विशिष्ट प्रकारच्या संमिश्रणापासून एकाद्या विषारी द्रव्याची उत्पत्ति होते आणि हें द्रव्य ज्या ठिकाणी आपल्या प्रभावाने शारीरक्रियांमध्ये वैषम्य उत्पन्न करतें त्या वेळी संनिपातिक विकार होतो. असल्या क्रियावैषम्याचे अवस्थेमध्येहि प्रत्येक क्रियेच्या वैषम्यामध्ये तरतमभाव असावयाचाच. आणि हा तरतमभाव सुचविण्यासाठीच संनिपाताचे अवस्थाभेद --- पोटभेद किंवा प्रकार सांगितले आहेत. संनिपात या शब्दानें त्रिविध क्रियांचे वैषम्य अभिप्रेत आहे. आणि असलें वैषम्य शरीरांत विशेष प्रकारच्या मिश्रणापासून तयार होते, असा उल्लेख आहे. आयुर्वेदानें कोणत्याहि रोगामध्ये आम, पच्यमान, आणि पक्व, अशा तीन अवस्था सांगितल्या आहेत. विकारोत्पादक दूषित द्रव्य एकाद्या जागीं सांठणें ही आमावस्था त्यानंतर त्या त्या दूषित पदार्थाचे शारीर पदार्थापासून पृथक्करण सुरु होणे पच्यमान अवस्था आणि पृथक्करणाने वेगळे झालेल्या मळांचे वियोजन पक्वावस्ठा, या अवस्था ज्या द्रव्यांमुळे उत्पन्न होतात असले रोगबीजभूत जे द्रव्य त्याला आम असें पारिभाषिक नांव आहे.

___________