पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१११
आम.


कार्य ज्या ठिकाणी होतें त्या यकृताला अनुसरून हा आमाशय शब्द योजला असावा.' रंजकपित्ताचे वर्णनांत' याच अर्थाने आमाशय या शब्दाचा उपयोग अष्टांगहृदयांत केला आहे. (आमाशयाश्रयं पित्तं रंजकं रसरंजनात् ) म्हणजे अन्नरसाचें यकृतांत नीट पचन न झाले त्यामुळे हा अपाचित रस सर्व धातूंमध्ये सामता उत्पन्न करण्यास समर्थ होतो. असा या आमशब्दावरून बोध होईल.
 आम म्हणजे स्थायी अपाचित अन्नरस असा अर्थ स्वीकारल्याने निदानशास्त्रामध्ये योजल्या जाणाऱ्या आमविषयक वर्णनाला पूर्णता येत नाहीं, इतकेंच नव्हे तर निदानमध्ये आणि चिकित्सेतहि जरूर तो वस्तुबोध होत नाहीं. कारण एकाद्या धातूमध्ये विकार होतो त्यावेळी यकृतांत नियमानेंच रसपचन होत नाहीं असा सिद्धांत बांधतां येणार नाहीं. अपाचित रसामुळे सर्व धातु व मळ दूषित होणें शक्य आहे. पण प्रत्येक विकृतीमध्ये रसाजीर्ण असेलच असें नाहीं. शिवाय जर रसापासून शरीरपोषण होतें व त्याचे आपचित अवस्थेचा सर्व पदार्थांना दूषक असा परिणाम होतो म्हणून आमरसाला 'आम' म्हणून संबोधून त्याचे महत्व सांगणे याहून पाचक पित्ताच्या जठराग्नीच्या-मांद्याने अपाचित अन्नाला आम हे नांव व का न द्यावें ? आम अन्नापासून अन्नरस आम व त्यामुळे सर्व धातु आम होणार हैंहि तितकेंच संभाव्य आहे. आमसंयुक्त रोगांना साम असे विशेषण आहे. (सामा इत्युपदिश्यंते ये च रोगारतदुद्भवाः । ) रोग आमसंभव असावयाचे व त्यांची सामावस्था आणि निरामावस्था चिकित्सेला विचारणीय म्हणजे प्रत्येक रोगामध्ये आम असावयास पाहिजे. व धात्वाश्रयी विकारांत रसाजीर्ण-आम-असणे निश्चित नाहीं असें असतां आमाची वरील व्याख्या निदानशास्त्राचे दृष्टीनें तरी अपुरी होईल. रोगांच्या नांवामध्यें आमय है एक आहे आणि प्रत्येक रोगाला आम अवश्य आहे असें या नांवावरून सुचविलें आहे. त्याचप्रमाणे:-

आमंविदह्यमानं च सम्यक् पक्कं च यो भिषक् ।
जानीयात्स भवेद्वैद्यः शेषास्तस्करवृत्तयः । "

 जो, आम पच्यमान आणि पक्व चांगल्या प्रकारें जाणतो त्यालाच वैद्य म्हणावें. इतर सर्व तस्कर समजावे. अशा प्रकारें रोगाची साम अवस्था व तिचें ज्ञान अवश्य सांगितलें आहे. दोषांचे साम अवस्थेमध्यें शोधनाचा निषेध सांगत असतां आमाची सर्वरोगव्याप्ति दर्शविली आहे.

सर्वदेहप्रसृतान्सामान् दोषान्न निर्हरेत् ।

अ. ह.