पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११२
आयुर्वेदांतील मूलतत्वें.



सर्व शरीरांत पसरलेल्या साम दोषांना काढू नयेत. तात्पर्य आम शब्दाने रसाची अपाचित अवस्था न मानल्यास सामरोग हे केवळ रसा- जीर्णापुरतेच मानावे लागतील आणि ज्या विकारांत रसाचें अपचन नाहीं त्यांमध्ये- सामता असंभवनीय असा अनवस्था प्रसंग येईल. रोगोत्पादक असे अपाचित व म्हणूनच दूषित जे द्रव्य तो आम होय. अशी आम या शब्दाची व्याख्या केल्याने रोगनिदानामध्ये रोगाची अवस्था ठरविण्याला सोपे जाईल. रोगाची संप्राप्ति सांगत असतां, संचय, प्रकोप, प्रसर, व स्थानसंचय यांचा उल्लेख केला आहे. कोठें तरी वाढ किंवा अडथळा हे रोगाचें सामान्य कारण मानल्यावर या वाढलेल्या किंवा अटकावलेल्या पदार्थाचे पचन होत नाहीं हें उघडच होत आहे. रसाचें शरीरांतील विक्षेपण निरंतर चालणारे ज्या ठिकाणीं स्थानी दुर्बळतेमुळे पोषक रसधातु पचला जात नाहीं तेथे विकार होतो असे रोगोत्पत्तीचें सामान्य कारण सांगितले आहे.

क्षिप्यमाणः सवैगुण्यासः सज्जति यत्र सः ।
तस्मिन्विकारं कुरुते ।

 फेंकला जाणारा रसधातु ज्या ठिकाणी थांबतो त्या ठिकाणी रोग उत्पन्न करतो. रसधातु थांबावयाचें कारण स्थानी वैगुण्य असतें.
 रसधातु सर्व शरीरभर फेंकण्यांत येतो व तो अपाचित नसतांहि स्थानवैगुण्यामुळे कोणत्या तरी ठिकाणी त्याला अडथळा होतो. यावरून त्या स्थानांत रसाचा प्रवेश होत नाहीं. त्या स्थानांतील पाचक शक्ति त्याला आत्मसात् करूं शकत नाहीं व अशा रीतीनें विकार होतो. त्यावेळी रसधातु सर्वत्र अपाचित नसून केवळ एकाद्या स्थानापुरताच अपाचित असतो. व अपाचितरस या स्थानापुरता आमहि म्हणतां येईल. पण मग ' आमाशयांत' या विशेषणाचा विशिष्टस्थलवाचक असा मर्यादित अर्थ करून भागणार नाहीं रसधातूचा कोणत्याहि ठिकाणी होणारा संचय किंवा ' संग ' तेथील पचनशक्तीच्या म्हणजे धात्वग्नीच्या अल्पबलाने होणारा असतो. रसधातूने शरीधातूंचे पोषण व्हावयाचे म्हणजे धावग्नीने किंवा प्रत्येक शरीरपदार्थांतील पाचकशक्तीनें त्याचे पचन व्हावें लागतें. धातूंतील ही पाचनशक्ति वाढली असतां धातूंचा -हास होतो. व कमी झाल्यास धातूची वाढ ( अर्थात् वैषम्य ) होते.

स्वस्थानस्थस्य कायाग्नेरंशा धातुषु संश्रिताः ।
तेषां सादातिदीप्तिभ्यां धातुवृद्धिक्षयोद्भवः ॥ १ ॥ ( अ० ह०)


  जठराग्नीचे ( स्वस्थानस्थस्य कायाग्नेः । ) अंश धातूंमध्ये असून त्यांची मंदता व अति वाढ यांनी अनुक्रमें धातूंची वृद्धि आणि क्षय होतात.