पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११९
दोषांचे त्रेसष्ट प्रकार.

 कारण शरीरांतील क्रियांचें वैषम्य दोन प्रकारचें एक क्रियांची वाढ व दुसरी क्षीणता. वर सांगितलेले प्रकार वाढीचे. अर्थात् क्षयाचेहि इतके होतील, तथापि त्यांतील त्रिदोषभेद विशेष चिंतनीय नाहींत. कारण, ज्या वेळीं एकाचा क्षय होईल त्या वेळी अर्थातच त्याचे विरुद्ध गुणाचे दोषाची वाढ होणार व त्रासदायक जी लक्षणे तीं क्षीणतेमुळे कां होईना पण वाढलेल्या दोषांची असणार. ज्यावेळी तीनहि क्रियांचा -हास असेल अशा वेळींच रोगसंभव आहे. पण या अवस्थेत तरी रोग कसा व्हावा ? व कोठें तरी संग पाहिजे तो, झाल्याशिवाय रोग नाहीं. संग म्हणजे अडथळा झाला कीं संचय झालाच व रोग संचयामुळे अर्थात वाढीमुळे झाला. यामुळे रोगप्रकरणांत क्षीण दोषांच्या क्रिया विरुद्ध गुणाचे वाढीचें साधन किंवा क्षीण संनिपात असल्यास इंद्रियनाश करूं शकतात.
 एक क्रिया क्षीण, एकाची वाढलेली व एक समप्रमाणांत असे हि आणखी त्रिदोषांचे सहा प्रकार सांगितले आहेत. हेहि प्रकार आरंभीच्या तारतम्य कल्पनेवरून ध्यानांत येण्यासारखे आहेत. असे प्रकार शिवाय एक क्षीण, दोन वृद्ध व दोन क्षीण एक वृद्ध याप्रमाणे सहा प्रकार एकूण बारा आणि पूर्ण सम स्थितीत असलेला एक याप्रमाणे.

________
एकंदर त्रिदोषांचे त्रेसष्ट प्रकार दिले आहेत.


 समस्थितीतील निरोगी, क्षीण स्थितींतील साम्यं, क्रियाशुन्य आणि वृद्ध स्थितींतील समवैषम्य-पूर्ण विकृत अशा या तीन अवस्था चिकित्सेला निरुपयोगी होत, बाकी ६० त्रिदोषभेद तारतम्यपूर्वक प्रत्येक प्रकारांतील अवस्थांतराला अनुसरून चिकित्स्य आहेत.
 याप्रमाणें त्रिदोषांची शरीराचे निरोगी आणि रोगी अवस्थेतील कार्ये होत असतात.
 शरीराचे सूक्ष्म अवलोकन करीत असतां त्याचे अनेकविध पदार्थांमध्ये ज्या सर्वव्याप्त आणि निरंतर चालणाऱ्या महत्वाच्या क्रिया दिसून आल्या आणि ज्यांवर शरीराचे अस्तित्व अवलंबून त्या क्रिया करणारे जे शरीरांतील पदार्थ त्यांना आयुर्वेदानें मुख्य मानून अन्वर्थक नांवांनी त्यांचा उल्लेख केला तेच हे त्रिदोष होत. व त्यांची यथार्थता याप्रमाणें आहे.

________