पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लो. टिळक ग्रंथसंग्रहालय, वाई


१२१
त्रिदोषांचा शास्त्रीय व्यवहार.

 नांतील अभिष्यंद असेल किंवा या तीन विकृतींपैकी दोन अथवा तीन विकृतींपैकीच कोणाकडे तरी उत्पादकत्व असावयास पाहिजे ही गोष्ट अगदीं उघड झाली आणि या तीन प्रकारांपैकी कोणता याचा बोध झाल्याशिवाय कोणत्याहि विकाराची चिकित्सा अशक्य आहे. केवळ रक्तविकार रक्त बिघडलें येवढे ज्ञान होऊन भागत नाहीं. तर त्याचा बिघाड झाला म्हणजे काय झालें हें कळावयास पाहिजे. एका रक्ताचे बिघाडामुळे कित्येक विकार होतात. प्रत्येक विकाराचे उत्पादकत्व विकृतांतील भिन्न अवस्थांवर अवलंबून असतें. सूज येणे, पांडुरोग, कांवीळ, कुष्ठ, फोड, काळेपणा, कोरडेपणा, दाह, गांधी इत्यादि प्रकार एका रक्ताचे बिघाडाने होतात. पण या प्रत्येक विकाराचे वेळीं रक्तदुष्टीचे प्रकार वेगळे असतात ? रक्तांत उष्णता वाढली की कमी झाली ? त्याची गति वाढली की कमी झाली, त्याचे अभिसरणांत एकादा अडथळा आला कीं काय ? त्यांतील अम्लता वाढली की क्षार कमी झालें इत्यादि अनेक पोटभेदांचे ज्ञानाशिवाय उपचारांचें धोरण ठरत नाहीं. हें धोरण ठरविण्यासाठीच आयुर्वेदाचे निदानशास्त्रांत त्रिदोषांचा उपयोग केला आहे. विकृतीमध्ये अनेक पोटभेद असले तरी त्यांचा अभिष्यंद, अभिताप आणि क्षोभ यांतच अंतर्भाव होतो व हे अनुक्रमें कफ पित्त आणि वायु या नांवानीं संबोधले आहेत. यांतहि मग त्रिदोषांचे गुणभेदाने आणखी पोटभेद करून अधिकांत अधिक स्पष्ट ज्ञान करून घ्यावयाचें. जसें - सामान्यतः कफाची विकृति या उल्लेखावरून रोग अभिष्यंदमूलक आहे ही गोष्ट ठरली. पण कफाचे कोणत्या गुणामुळे हा अभिष्यंद झाला याचा खुलासा पाहिजे. आर्द्रता किंवा शीतता वाढली की स्निग्धता वाढली आणि तीमुळे अभिष्यंद झाला; पित्ताचा विकार आणि अभिताप या सामान्य ज्ञानानंतरहि पित्ताची उष्णता वाढली की तीक्ष्णता हा विचार करावाच लागतो. क्षोभ वायुमुळे खरा, पण वायूचे क्षोभाला जो त्याचे मार्गाचा अवरोध व्हावा लागतो त्याचे स्वरूप कोणतें, रूक्षतेमुळे की शैत्यजन्य संकोच झाल्यामुळे कीं एकाद्या पदार्थाचे संचयामुळे या गोष्टींचा उलगडा होण्यासाठी केवळ त्रिदोषांचे स्थूल ज्ञान पुरेसें नाहीं, त्यासाठी अत्यंत सूक्ष्म ज्ञान पाहिजे; असा इषारा स्पष्टपणे आयुर्वेदाने देऊन ठेविलेला आहे. रोगविज्ञान किंवा निदानशास्त्र यामध्ये संप्राप्तीला अत्यंत महत्व आहे. संप्राप्ती ह्मणजे विकृत दोषांचें सूक्ष्म ज्ञान होय. ( अंशांशपरिकल्पना संप्राप्तिः ) शरीराचे निरनिराळ्या स्थानांतील निरोगी स्थितीत घडणारे व्यापार म्हणजे त्रिदोषांचें नित्य व अविकृत कार्य, व हेच विकृत व्यापार म्हणजे दोषांचें विकृत कार्य किंवा रोगकर्तृत्व होय. ह्मणजे अविकृत अशा शारीरक्रियांचें ज्ञान आ.... ६