पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२४
आयुर्वेदातील मूलतत्वे.

 असतो. उदाहरणार्थ :- आमाशय किंवा अन्नाशय यांचे विकारांवर चिकित्सकाला उपचार करावयाचे आहेत. अशा वेळीं आमाशयाची रचना, आकार, लांबी, रुंदी, जाडी, वजन उत्तम प्रकारें माहित असली तरी असल्या आमाशयांत अन्नपचनाचे होणारे कार्य व त्याचा क्रम यांचे ज्ञानाची अवश्यकता आहे. हें पचन कसें होतें, कशामुळे होतें व रोगीस्थितीमध्ये काय विकृति झाली याचें ज्ञान पाहिजे. निदानचिकित्सेमध्ये शारीरविज्ञानापैकीं या दुसऱ्याच प्रकाराला महत्व अधिक असतें. पहिल्या प्रकारचे ज्ञानाला स्थूल शारीरविज्ञान, आणि दुस-या प्रकाराला सूक्ष्म शारीरविज्ञान ह्मणतां येईल. प्रचारांत या दोन प्रकारचे विज्ञानाला अनुक्रमें शारीरशास्त्र व इंद्रियविज्ञानशास्त्र या नांवाचा उपयोग बहुधा केला जातो. आयुर्वेदामध्ये ह्यापैकीं इंद्रियविज्ञानाचा स्वतंत्रपणे उल्लेख नाहीं. आणि याचे कारण असें आहे कीं, आयुर्वेदामध्ये क्रियाकारी पदार्थ वातादि दोष मानण्यांत आले आहेत. व त्यांची यथार्थता उघड आहे. व हे वातादि क्रियाकारी मानल्यावर इंद्रियांच्या क्रिया वेगळ्या राहत नाहींत शिवाय, चिकित्साशास्त्रामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे कीं, इंद्रियांवर चिकित्सा करतां येत नाहीं. प्रथमतः हैं विधान विचित्र वाटेल परंतु थोडा सूक्ष्मरीत्या विचार केल्यास त्याची सत्यता ध्यानी येईल. ज्याप्रमाणें शरीराच्या स्थूल अशा भागावर उपचार यशस्वी होत नसून तदंतर्गत सूक्ष्म पदार्थांवर उपचारांचा परिणाम होऊन त्यांचे द्वारा दृश्य पदार्थांतील विकृति नाश पावते. त्याचप्रमाणे कोणत्याही इंद्रियाची शक्ति किंवा कार्य तत्वतः नाश पावले अथवा कमी झाले तर त्यावर उपाय - उचापार नाहींत. इंद्रियाचे व्यापारांत-क्रियेत- येणारा जो अडथळा त्यावर उपाय असतात. कोणत्याही इंद्रियाचे नित्यव्यापारांत येणारा अडथळा दूर करून त्या इंद्रियाची क्रिया पुनः सुरळीत चालू करणे व अशा रीतीनें दृश्य पदार्थात ह्मणजे एखाद्या धातूंत, आशयांत किंवा अवयवांत अथवा त्यांचे स्थूल क्रियेत आलेली विकृति नाहींशी करणे यालाच चिकित्सा असें नांव आहे.

चतुर्णी भिषगादीनां शस्तानां धातुवैकृते ॥
प्रवृत्तिर्घातुसाम्यार्थी चिकित्सेत्यभिधीयते ॥ १ ॥ चरक.


 म्हणजे उपचार हे शरीराच्या नाशवंत स्थूल घटकांवर नाहींत आणि मर्यादित अशा इंद्रियसामार्थ्यावरही नाहीत. तर ते या दोहोंचे मध्यवर्ती असणारे असे साधक क्रियाकारी व सामर्थ्यसंपन्न जे पदार्थ म्हणजे त्रिदोष त्यांवर करावयाचे असतात. एखाद्याला एखाद्या विकारांत स्पर्शज्ञान कमी झाले अशा वेळीं स्पर्शनेंद्रिय जी त्वचा तीवर अथवा इंद्रिय- सामर्थ्यावर उपचारांचा उपयोग नसून बाह्य स्पर्श आणि त्याचे-