पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२५
शारीरविज्ञानामध्ये त्रिदोष हे किती महत्वाचे आहेत ?

 ज्ञान ज्यांना होतें अशा ज्ञानवाहकांमध्ये ज्या कोणत्या एकाद्या द्रव्यानें, ( दूषित, रस, रक्त, ) अडथळा येऊन स्पर्शज्ञान कमी होतें, तो अडथळा दूर करणे अशी उपचारांची पद्धत असते. शेकणे अथवा स्वेदन औषधे अशा प्रकारचेंच कार्य करीत असतात. ज्या कोणत्याही भागामध्ये अशा प्रकारें अडथळा उत्पन्न होतो तेथें, त्या भागाची विशिष्ट प्रकारची हालचाल म्हणजे गति आणि अभिसरण यांमध्येंच तत्वतः अडथळा येतो. व ही गति आणि अभिसरण सुरळीत चालू करणें हेंच उपचारांचें धोरण असतें. एकाद्या घनद्रव पदार्थाचे अधिक संचयामुळे हा अडथळा उत्पन्न झाला, वाढलेल्या कोरडेपणामुळे होणाऱ्या स्रोतःसंकोचामुळे हा व्यत्यय आला की, वाढलेल्या उष्णतेच्या दाहक स्पर्शानें संकुचित झालेल्या स्रोतसांत अभिसरणकार्य नीट घडत नाहीं या प्रकारचा खुलासा झाल्याविना, पहिल्या प्रकारांतील अतिरिक्त संचयाला स्रावक किंवा शोधन असे तीक्ष्ण असे उपचार, दुसऱ्या प्रकारांत, विकासी किंवा उत्तेजक आणि त्याबरोबरच वाढलेली रूक्षता कमी होण्यासाठी उष्ण आणि स्निग्ध असल्या प्रकारचे उपचार आणि वाढलेली उष्णता व दाह कमी होण्यासाठी शामक - शीत उपचार अशा प्रकारचें चिकित्सेचे स्वरूप ठरविण्याला रोग व ते होण्याचे कारणीभूत विकृततील फरक कळावा लागतो. या प्रकारानांच, अनुक्रमें श्लैष्मिक, वातिक आणि पैत्तिक या नांवांनी संबोधण्यांत येतें. आणि यासाठीच आयुर्वेदामध्यें त्रिदोषविज्ञान हैं शारीरविज्ञानांत महत्वाचे मानले आहे. त्याचे अभावी चिकित्सा करतां येणार नाहीं. मात्र त्रिदोषांचा शास्त्रकारांना अभिप्रेत असा व्यापक व बोधक अर्थ ध्यानी घ्यावयास पाहिजे. अवयवांचे ज्ञान व इंद्रियांचे ज्ञान झाल्यावर देखील जर त्यांतील क्रियावैषम्यामध्ये उत्सर्जक शक्ति विकृत झाली, (वायु) संग्राहक शक्ति विकृत झाली (कफ) कीं पाचकशक्ति विकृत झाली, (पित्त) याविषयीं खुलासा न होईल तर विकृतिज्ञान होणें अशक्य व उपायहि व्यर्थ होतील. आयुर्वेदाचे त्रिदोषपद्धतीने या सूक्ष्म भेदांचे ज्ञान होत असल्यानें हैं ज्ञान महत्वाचे ठरते. शारीरव्यापारांतील प्रत्येकाचें संग्राहक, पाचक, व उत्सर्जक किंवा संयोजक, विभाजक, आणि वियोजक अशा स्वरूपाचे ज्ञान झाल्याशिवाय शारीरविज्ञान अपुरेंच राहणार. भाषाभेदामुळे या ज्ञानाचे वाचक शब्द निरनिराळे असले तरी या दृष्टीनें विसंगतपणा राहतच नाही.

___________