पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२७
चिकित्सेमध्ये त्रिदोषविज्ञान किती महत्वाचे आहे ?



दोषा एव हि सर्वेषां रोगाणामेककारण !

( अष्टांगहृदय सू० अ १२ ).

 दोष हेच सर्व रोगांचें मुख्य कारण आहे. असा सिद्धांत सांगितला असतांहि ज्याप्रमाणे प्रतिरोगांत वेगळी रोगोत्पादक कारणें व रोगाची वेगळी संप्राप्ति देऊन स्थानसंश्रयाला निदानांत महत्त्व दिले आहे त्याचप्रमाणे चिकित्साशास्त्रांतहि चिकित्सोपयोगी पदार्थांचे प्रभावाला महत्व दिले आहे. व यावरून केवळ दोषांवर ' बस्तिर्विरेको वमनं, तथा तैलं घृतं मधु । बस्ति विरेचन, वमन, तेल, तूप, व मध, येवढेच उपचार सांगितले नाहींत. निरनिराळ्या रोगांवर अनेक प्रकारचे उपचार सांगण्याचें कारण हेंच होय. रोगांचे प्रकार ठरवितानांहि त्यांमध्ये इतके प्रकार संभवू शकतात कीं, अखेर रोगी स्थानांतील क्रियावैषम्यावरच निदानाचें तत्व प्रस्थापित करावे लागते. आणि शरीरांतील अनेकविध विकार या मुख्य तीन क्रियांचे अनेक प्रकार असल्याकारणाने मुख्य या तीन क्रियांची विकृतीच रोगज्ञानाचें मुख्य साधन ठरते मग अर्थातच या विकृतीवरील उपचार हैं चिकित्सेचें धोरण निश्चित झाल्याने निदानाप्रमाणें चिकित्सेमध्येहि त्रिदोषांनाच सहजी प्राधान्य प्राप्त होते. उदरांतील एकादा रोग असून त्याचे कारण मलोत्सर्जनाची न्यूनता किंवा अभाव असे निदर्शनास आले व त्याला अनुसरून विरेचन हा स्थानानुकूल उपचारहि उघड ठरला. परंतु विरेचन औषधे अनेक प्रकारची. मृदु, तीक्ष्ण, रूक्ष, स्निग्ध इत्यादि गुणांची. त्यांतून कोणत्या औषधाचा उपयोग करावयाचा हा प्रश्न शिल्लक राहतोच. आणि त्याशिवाय औषधाचा उपयोग केल्यास अपाय होणें संभाव्य अस म्हणून मलावरोध कळल्यावरहि तो कां झाला ? उत्सर्जनक्रियेच्या मांद्यामुळें, अपचनामुळे की आणखी एकाद्या क्षोभक कारणानें याचा विचार करून संचित मळाचे उत्सर्जनासाठी, तीव्र, मंद, वगैरे विरेचनाचा उपयोग करावयास पाहिजे. ह्यासाठीं चिकित्साप्रसंगी त्रिदोषांना महत्व आहे. आयुर्वेदाने विरेचक पदार्थांची दोषभेदानं केलेली योजना है स्पष्ट करते.

कपायमधुरै पित्ते विरेकः कटुकैः कफे ॥
स्निग्धोष्णलवणैर्वायौ ।। (अहृ.सू. अ. १७)


 तुरट व मधुर पदार्थांनी (आवळकाठी, त्रिफळा वगैरे) पित्तावर, तिखट पदार्थांनी (रेवाचिनी, कपिला, स्वर्णक्षीरी इ० ) कफावर आणि स्निग्ध, उष्ण व खारट पदार्थांनी वायूवर (एरंडेल, द्राक्षै इ० ) विरेचन द्यावें. याप्रमाणे सर्वत्र उपचारांचें धोरण ठरविण्याचे मुख्य साधन आयुर्वेदांत त्रिदोष आहे. त्याकडे दुर्लक्ष्य केल्यास चिकित्सा यशस्वी होणें