पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२३
देश दोष, प्रकृति.

  कफ प्रकुपित झाला असतां स्निग्धता, कठीणता, कंडु, शैत्य, जडता, बंध, लेप, सुंदपणा, सूज, अपचन, अतिनिद्रा, वर्ग श्वेत, तोंडाला रुचि गुळचट आणि खारट हीं लक्षणें होतात.
 ( ह्रीं लक्षणें सर्वसामान्य आहेत. विकार ज्या शरीरभागांत झाला असेल त्या स्थानाला अनुसरून यांतील लक्षणे असतात. हीं लक्षणें साधारणतः सर्वसामान्यरीत्या नेहमी होणारी प्रमुख अशीं दिलौं आहेत. यांसारखी व यांवरून कल्पना करतां येण्यासारखी आणखींहि नाहीत असें नाहीं. ही सामान्यत्वें लक्षणांची दिशा आहे. )

(१९) वातातींवरील शामक उपाय ?

 वायूवर स्नेहन, स्वेदन, मृदु, सौम्य, शोधन, मधुर, अम्ल, खारट, व अल्प असा आहार अभ्यंग, मर्दन ( दावणें ) बांधणे, त्रासावर्णे, सेक ( धार ओतणें ) पिठाची व गुळाची दारु, स्निग्ध व उष्ण बस्ति, बस्ति विधींतील पथ्य, सुखी राहणी, दीपन पाचन पदार्थांनी सिद्ध केलेले अनेक जातीचे स्वेद ह्यांचा वातविकारावर युक्तीनें उपयोग करावा. सर्व उपचारांमध्यें अनुवासन म्हणजे स्नेहवस्ति, तेल आणि पुष्टिकारक पदार्थ मांसाचा रस (सुरखा ) सर्व प्रकारचे वातविकारावर श्रेष्ठ प्रतीचे उपचार आहेत.
 पित्तावर-- घृतपान, गोड आणि शीतवीर्य औषधांनीं विरेचन, गोड, कडू आणि तुरट अशी औषधे व आहार, चांगले सुगंधी पदार्थ, शीत स्थलीं बसणें, हार माला धारण करणे, गायन, गोष्टी इत्यादीनी मनोरंजन वगैरे उपचार असून प्रामुख्यानें सौम्यभाव दूध, तूप, व विरेचन हे श्रेष्ठ होत.
 कफावर तीक्ष्ण असे वमन आणि विरेचन, तिखट, कडू, तुरट, रूक्ष, उष्ण असा व अल्प आहार, जुनें मद्य, मैथून, जागरण, व्यायाम, चिंता, मर्दन इत्यादि उपचार असून विशेषतः वमन, यूष ( कढण, कांट) मध, चर्बी कमी करणारे पदार्थ, धूम्रपान, उपवास गंडूष (गुळण्या ) व त्रास हे कफाचे प्रकोपावर गुणकारी होतात.

२०. वृद्धि, क्षय व साम्य याचें सामान्य लक्षण.

 वातादि दोष वाढले असतां वाढीचे योगानें त्यांचे नित्य क्रियांची वाढ होते. कमी झाले असतां नित्य व्यापारांत त्या मानानें क्षीणता येते. व सम स्थितीमध्ये नित्य व्यापार सुरळीत चालतात.

(२१) दोष व देश.

 ज्या प्रांतांत पाणी, झाडे आणि पर्वत कमी तो देश जांगल या नांवाने ओळखण्यांत येतो. यामध्ये वायूचे प्राधान्य असतें.