पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३४
आयुर्वेदातील मूलतत्वें

 ज्यांत पाणी, झाडें, पर्वत पुष्कळ त्याला अनूप म्हणतात व तेथें कफाचें आधिक्य असतें.
 ( आनूप प्रांत रोगट अधिक व जांगल त्याहून कमी, साधारण म्हणजे समशीतोष्ण प्रांत निरोगी; उत्तम. )

(२२) दोष व प्रकृति.

 वातप्रकृति मनुष्य, साधारणतः कृश व उंच, शरीराचा वर्ण काळसर ( भुरकट) त्वचा फुटीर, केसांना स्निग्धता नसणें ( भुरे ) स्वभाव चंचल, बुद्धि अस्थिर, खादाड, आवाज रूक्ष (घोगरा ). डोळे धुरकट व त्यांत पाणी नसणे आणि झोपेत ते पूर्ण न मिटणे. वातप्रकृति मनुष्यांना गोड, आंबट, खारट, ऊष्ण अशा पदार्थांची स्वाभाविक आवड असते. हे नास्तिक व विलासी असतात.
 'पित्तप्रकृति मनुष्य वर्णाने गौर, हातापायांचे तळवे व तोंड लाल वर्णाचे, केसांचा वर्ण पिंगट, केस कमी, भूक, तहान तीव्र, बांधा मध्यम हीं माणसें अभिमानी, शूर, बुद्धिमान् व दिलदार असतात, यांना वलीपलित लवकर येतें, रागीट असता, हेकेखोर असतात. श्रमसहिष्णुता कमी असते, डोळे पिंगट असतात. ऊष्ण पदार्थ, हवा इत्यादिकांचा कंटाळा असून शीत पदार्थ, हवा त्याचप्रमाणे गोड, तुरट, कडू पदार्थांची त्यांना स्वाभाविक आवड असते.
 कफाप्रकृति मनुष्यांचा वांधा मजबूत, स्थूल, सांधे मांसाच्छादित, शरीर मांसद, वर्ण स्निग्ध गौर, पुष्ट, केस काळे, स्निग्ध एकंदरीत दर्शनीय शरीर, आवाज गंभीर, घुमणारा; स्वभाव गंभीर, शांत व नम्र, आहार कमी, झोंप अधिक व या मनुष्यांच्या वागणुकीत एक प्रकारची गंभीरता आणि स्थिरता असते.
 वातप्रकृतीहून, पित्तप्रकृती व तीहून कफप्रकृति अधिक चांगली परंतु सर्वांहून समदोष प्रकृति उत्तम, या प्रकृतीची कल्पना करावयाची म्हणजे सर्व शारीरिक व मानसिक बाबतीतील उत्तमता. अर्थात् दुर्मिळ. )

(२३) दोष व अग्नि किंवा पचनशक्ति.

 जठराग्नि वातदूषित असतां आहाराचे पचनामध्ये विषमता असते म्हणजे कधी नियमित वेळांत पचन नीट होते तर कधी होत नाही.
  जठराग्नि पित्तदूषित असतां पचन अधिक व लवकर होतें.
  जठराग्नि कफदूषित असेल तर पचन कमी व उशीरानें होतें.