पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१५

हे पान प्रमाणित केलेले आहे.



आयुर्वेदांतील मूलतत्वे.

नाही. अत्यंत सूक्ष्म का होईना, पण एकाद्या पदार्थाचा आधार त्यांना अवश्य असतो. मग त्रिदोष ही तरी नुसती शक्ति कशी असेल ? शिवाय स्थूळ पदार्थरूपी शरिरांत पदार्थाचा अभाव आहे, असें शक्तीला स्थान कोठे मिळेल ? या शक्तीला एकाद्या पदार्थाचा आश्रय करूनच राहणे भाग. असला जो आश्रय तेच हे अणु व म्हणून त्रिदोष हे पदार्थ होत.
 प्र० ५:-सर्व शारीर घटकांतील 'शक्ति' मानली तरी ती एक असावी. मग दोष तीन कां? उत्तरः- वस्तुतः जीवनव्यापारांचे कर्तृत्व असलेली शक्ति म्हणजे जीवनशक्ति एकच खरी; पण जीवनव्यापार ज्याला म्हणावयाचा त्याचेच स्वरूप त्रिविध आहे. असें की, नवें उत्पन्न होणे, नव्या जुन्यांचे पृथक्करण होणे. आणि झिजलेल्यांचा उत्सर्ग होणे. या व्यापारालाच जीवनव्यापार म्हणतात. मग जर जीवनव्यापारांत त्रिविधता आहे, तर हा विविध व्यापार सुरळीत पार पाडणारी जीवनशक्ति त्रिविध असावी हे युक्त आहे त्रिविध जीवनशक्तीचे आधारभूत जे अणु, ते शरिरांतील त्रिदोष होत.
 प्र० ६:--आयुर्वेदानें त्रिदोषांमध्ये या तीन प्रकारच्या जीवनव्यापाराचा उल्लेख केला आहे काय ? उत्तरः--आयुर्वेदाने जी दोषांना नावे दिली आहेत, त्यांतच या त्रिविध व्यापारांचा स्पष्ट बोध होईल अशी योजना आहे. वायु-गतिमय-उत्सर्जक; पित्त पाचक, श्लेष्मा संयोजक. नवीन घटकाचा संयोग प्रथम त्यांतील क्रियाकारी अणूवर होऊन त्यानंतर त्याचे पचन, पृथक्करण आणि मग उत्सर्जन हा जीवनव्यापाराचा क्रम त्रिदोषांचे नांवांनी आयुर्वेदाने दाखविला आहे.
 प्र. ७:--प्रत्येक घटकामध्ये हा व्यापार चालतो. व त्यावरून सर्वव्यापी त्रिदोषांचे कर्तृत्व पटण्यासारखें व एवढ्यावरून शरिराच्या अनेकविध अवयवांची कार्ये कशी समजतात ? उत्तरः--त्रिदोषविज्ञान है शरिराच्या सूक्ष्म क्रियांचे स्पष्टीकरणासाठी आहे. शरिराच्या विविध स्थानांत ज्या विशिष्ट क्रिया चालतात, त्यांचा स्वतंत्र विचार अवश्य केला पाहिजे. मात्र तो करीत असतांहि त्रिदोषविचार सुटत नाही. ज्याप्रामाणें एका घटकामध्ये या तीन क्रिया सूक्ष्मपणे चालतात, त्याच सर्व शरिराच्या क्रियांचे सूक्ष्म अवलोकन केल्यास त्यांतहि चौथी क्रिया नाही असेंच दिसेल. प्रश्न इतकाच की काही शरीरभाग घेण्याचे अगर संग्रहाचे काम करतात, काहीं पचवितात तर काही उत्सर्जनाचे कार्य करितात. या तीन प्रकारच्या इंद्रियांत त्या क्रिया करणाऱ्या अणूंची संख्या अधिक असते. शरिराच्या सर्व इंद्रियांचे स्थूल वर्गीकरण केल्यास संग्राहक इंद्रिये, पचनेंद्रिये आणि उत्सर्जनेंद्रिये असेंच होते. मग कोणत्याहि ठिकाणी त्रिदोषज्ञानाचा उपयोग कां न व्हावा.?