पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४१
थोडें स्पष्टीकरण.

 एक प्रकारचे पातळ स्वरूप येते व त्याचवेळीं दूषित किंवा अशुद्ध भागाचे उत्सर्जन होतें. प्रत्येक घटकांतील असला उत्सर्जित द्रवभाग वाहून नेणारा सार्वदेहिक द्रव-अभिष्यंद रूपी म्हणजे मूत्राचें व्यापी स्वरूप होय. आणि या क्लेदाचें शारीरिक उष्णतेनें जें बाष्प होतें व पचनाला मदत होते तो स्वेद समजावयाचा. ह्या तीनहि अवस्थांतील पदार्थांच्या अविकृत स्थितीमध्येच शरीरधातु सुरक्षित राहतात. मळांचे जर फार त्वरित उत्सर्जन झाले तर शुद्धधातु झिजण्याचे मार्गाला लागतील. व मलभाग योग्य प्रमाणांत उत्सर्जित न झाला तर त्यामुळे धातु दूषित होतील. म्हणून त्यांची साम्यावस्था जरूर आहे.

थोडें स्पष्टीकरण.

 सर्व शरीरभर अर्थात् शरीराचे अति लहान घटकांतहि हे तीन दोष व मळ असे वर्ग आहेत. शरीर असंख्यात घटकांनी बनले आहे.

शरीरावयास्तु परमाणुभेदेन अपरिसंख्येया भवंति । ( चरक )


  परमाणुभेदाने शरीरावयव असंख्यात आहेत.

 मग यांतील कोणताहि घटक घेतला तरी तो दोष, धातु व मळ या त्रिविध स्वरूपाचा असावयास पाहिजे हे उघड झालें. कारण " दोषधातुमलमूलं हि शरीरम्, " हा सिद्धांत आहे. शरीराच्या प्रत्येक घटकाला उत्पत्ति, स्थिति व विनाश असतात. व ह्या तीन अवस्था भोगण्यासाठी तो नेहमीं तीन अवस्थांतच - स्वरूपांत - राहणार. एक उत्पद्यमान दुसरी स्थीयमान आणि तिसरी क्षीयमाण किंवा उत्पन्न होत असलेला एक भाग, उत्पन्न होऊन पूर्णस्वरूप पावलेला दुसरा भाग आणि झिजकट असा तिसरा भाग. हा जो तिसरा तो मळ. कारण शिजून झाल्यावर त्याचे उत्सर्जन होणेंच अवश्य. न होईल तर ही घाण चांगल्या भागाला दूषित करील. पण त्या क्षीयमाण भागाने या घटकाची एक बाजू सुरक्षित असते. जर झिजकट भाग कांहीं काळ तरी न राहील तर चांगल्या पदार्थाला हें स्वरूप लवकर येईल. अशा प्रकारचें जें संरक्षक पण झिजकट असे धातुस्वरूप ते संरक्षक म्हणून महत्वाचे मळ सांगण्यांत आले आहेत. उत्पन्न होणें आणि झिजणें या दोन क्रियांमध्ये निवळ स्थितिस्वरूपाचा किंवा शुद्ध स्वरूपाचा अंश किती असतो हा प्रश्न विचारणीय आहे. किंबहुना हा भाग कल्पनेनें अस्तित्व मानण्यासारखाच आहे असें म्हटलें असतां चालेल. शरीरघटकांमध्ये ही जी नित्य व निरंतर उत्पत्ति व विनाश अशा प्रकारची क्रांति चालू असते तिचें कर्तृत्व कोणाकडे तरी असावयास पाहिजे. असे कर्तृत्व याच घटकांतील अंतर्गत सूक्ष्म भागाकडे असतें. ह्या