पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४९
थोडें स्पष्टीकरण.

 सिद्ध कल्पना चुकीची का मानावी ? कोणत्याही द्रव्यांतील गुण व सामर्थ्य त्यांतील सूक्ष्म अशा अणूंवर अवलंबून असतें. शरीराचेहि तत्व हेंव व म्हणून आयुर्वेदाने ते दोष-

विकृताऽविकृता देहं घ्नांति ते वर्तयंति च ॥ (अ हृ )

 विकृत झाले असतां देहाचा नाश करतात व अविकृत असतां त्यां देहाचें धारण व वृद्धि करतात, असे महत्व दिले आहे.
 साधारणतः पदार्थमात्राचे उत्पत्तिक्रमाकडे पाहिलें असतां सहज ध्यानी येण्यासारखी गोष्ट अशी आहे कीं, पांचभौतिक परमाणु कांहीं एका विशिष्ट प्रमाणांत कोणत्या तरी अज्ञेय सामर्थ्याने एकत्र होतात व तसे ते संयुक्त झाल्यावर त्यांची वाढ व कांहीं गुणधर्म, कायँ इत्यादि सुरू होतात. व कांहीं कमी अधिक काळाने त्यांचा विनाश अथवा क्रांति, जन्मांतर - होतो. प्रथम संयोग कोण करतो हा प्रश्न निरुत्तर असून त्यावर समाधानासाठी कोणी परमेश्वर तर कोणी निसर्ग; असें स्वतःच्या मनोभावनेला अनुसरून उत्तर मानून घेण्यांत येते. प्रथम संग्राहक, अशा रीतीनें अज्ञात असला तरी पुढील त्या पदार्थाचा जीवनक्रम अनुभवावयास मिळतो. प्रत्येक पदार्थाचा आकार, कार्य, सामर्थ्य व आयुष्य ह्यांत भिन्नता असते. व ही भिन्नता का असावी याचें सहज सुचणारे उत्तर म्हणजे संयुक्तावस्थेतील संयुक्त सामर्थ्याची भिन्नता है होय. हैं संयोगी सामर्थ्य जितकें प्रभावी तितका त्या पदार्थाचा प्रभाव मोठा व जितकें टिकाऊ तितका पदार्थ आयुष्मान् अधिक. पदार्थांच्या उत्पत्तीच्या गूढ प्रश्नाचा विचार फारसा प्रस्तुत नाहीं; तरी त्यांतील एका तत्वाचा स्वीकार अपरिहार्य आहे तें हें कीं, प्रत्येक पदार्थामध्ये त्याचे उत्पत्तीचे प्रसंगी संयुक्त स्वरूप पावलेले व कांहीं काल त्याच अवस्थेत टिकणारे असे पदार्थ किंवा अति सूक्ष्म कां होईनात- अणु-परमाणु- अवश्य असून त्यांचेच सामर्थ्याने पदार्थाचे क्रांत्यात्मक व्यापार चालतात. या अणूंची संयुक्तावस्थेत असलेल्या- शक्ति क्षीण झाली - संपली की पदार्थाचेंहि सामर्थ्य व आयुष्य संपून त्याला वियुक्तावस्था किंवा पंचत्व प्राप्त होते. अर्थात् दृश्यस्वरूप नाहींसें होते. पदार्थाचें हृदय स्वरूप पालटतें पण जर अदृश्य स्वरूपहि दैनंदिन क्रांति अनुभवील तर मग अमर्याद टिकाऊपणा सृष्टपदार्थांमध्ये राहू शकेल. शरीराचे घटक नित्य झिजतात- नाश पावतात. अर्थात् नवे उत्पन्नहि होतात, व या दृष्टीनें शरीर नित्य नवं होते, अशी एक कल्पना प्रचारांत आहे. पण ध्यानांत ठेवणें अवश्य आहे की, या बदलत्या घटकांत त्यांना बदलणारे पण स्वतः न बदलणारे असे जर घटक नसते तर मानवी शरीर जगाचे अंतापावेतो टिकविणें शक्य झालें असतें. शरीराच्या बाल्यादि अवस्था, प्रत्येक इंद्रियाची व अव-