पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५१
'थोडे स्पष्टीकरण.

  लोक हा शब्द संयोगापेक्षी आहे कारण सामान्यतः वरील सहा धातूंचा समुदाय म्हणजेच लोक ( पदार्थमात्र ) होय. यांचा विभक्तपणा म्हणजे वियोग त्याला जीवापगम, प्राणनिरोध, भंग ही नांवें आहेत. ( मृत या अर्थाची ).
 या वर्णनामध्यें शारीरसंघाला महत्व दिले असून असल्या प्रकारचा संघ हा कोणा तरी एका विशिष्ट तत्वाचे सामर्थ्यावरच टिकून ठराविक कालपावेतों रहावयाचा हे ओघानेच ठरले. या सामर्थ्याचा कांहीं ठराविक नियमानुसार मर्यादित व्यय झाला तर त्याला निश्चित जी मुदत ती उपभोगितां येते आणि अव्यवस्थितपणानें फाजील व्यय झाला की लवकरच क्षय होऊन संयोगाभावी 'पंचत्व, येते. शारीर पदार्थांचे प्रमुख असे तीन विभाग, म्हणजे ( दोष, धातु व मळ ) करून ते अन्योन्याश्रयी असल्याने सर्वांना देहधारक म्हणून सांगण्यांत आलें असले तरी, आद्य उत्पादक, व वर्धक आणि ज्यांचे अभावी धातुमळांचें अस्तित्व राहात नाहीं अथवा संभवत नाहीं, उलट धातुमळांची विकृति ज्यांमुळे जाते असल्या सामर्थ्यसंपन्न व सूक्ष्म अणूंना शारीरपदर्थात महत्व अधिक हैं उघड आहे. जोपर्यंत या घटकांत सामर्थ्य आहे, तोंपर्यंत दूषित धातुमळ दुरुस्त होतात, कमी झाले तर वाढतात. पण त्यांचें सामर्थ्य क्षीण झालें असतां सर्व साधने व उपाय निरुपयोगी ठरतात व यावरून यांचे महत्व उघड होते. यासाठी आयुर्वेदानें शारीरविवेचनामध्ये दोषांना महत्व दिले आहे. कोणत्याहि शरीरभागाची विकृति ध्यानी घेतांना त्या स्थानाला अनुसरून उत्पादक दोषांचे सामर्थ्य विचारांत घेतल्याविना विकृतीचे पूर्ण स्वरूप आकलन होणारें नाहीं. विकृतीची साध्यासाध्यता कळणार नाहीं, व दोषभेदांशिवाय उपचारांचें धोरण ठरवितां येणार नाहीं. चरकामध्यें--

सर्वदा सर्वथा सर्वं शरीरं वेद यो भिषक् ॥
आयुर्वेद स कात्स्येंन वेद लोकसुखप्रदम् ॥

( च. शा. अ. ६ को २१ )


 नेहमी सर्व शरीर सर्व प्रकारें जो वैद्य जाणतो तो लोकसुखदायी अशा सर्व आयुर्वेदाला जाणतो. असा उल्लेख असून यांतील सर्वथा याचा अर्थ सूक्ष्म दोषविज्ञानसुद्धा असाच आहे.
 प्रथमतः शरीराचे मुख्य तत्व व त्याचे तीन विभाग अशा प्रकारची तात्विक उपपत्ति निश्चित झाल्यावर 'व्यपदेशस्तु भूयसा ( अधिवयावरून निर्देश ) या सामान्य नियमानुसार ज्या टिकाणी या तात्विक तीन क्रियांचे आधिक्य, ते आशय, ते धातु, क्रियासूचक अशा वातादींचे नांवाने ओळखण्यांत येऊ लागले. त्याचप्रमाणे क्रिया व क्रियाकारी सामर्थ्य पदार्थविहीन राहू शकत नाहीं अर्थात् या सामरर्थ्याचेच