पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५७
त्रिदोषांसंबंधीं गैरसमज.


अवश्य होतें याविषयीं संशय कां असावा १ पक्वाशयाश्रयी वायु व अस्थिगत वायु, वायूने येणारी सूज व वातिक मस्तकशूळ, डोळ्यांची आग करणारे पित्त व मळमळ, जळजळ करणारे पित्त, खोकल्यांतून पडणारा कफ व सांध्यांतील कफ इत्यादि सर्व एकाच एका सामान्य स्वरूपाचे असते तर आयुर्वेदाचें चिकित्साशास्त्र इतके विस्तृत झालें नसतें. या स्थानांतील तारतम्यपूर्वक संबंध ध्यानी घेऊन विचार करावयास पाहिजे.
 अपरिसंख्येय परमाणु समुदाय स्वरूपीं शरीरामध्ये या परमाणुंचा संयोग व शारीराचे व्यापार अखंड राखण्यासाठी संयुक्तावस्थेतील शरीर घटकांमध्ये असणाऱ्या व्यापी व कर्तबगार अणूंना महत्व देऊन त्याचे सामर्थ्यावर दृष्टी ठेवण्यासाठी विदोषवाद उत्पन्न झाला. हें ध्यांनीं घेऊन मग त्यांचा निरनिराळ्या गुणांनी निरनिराळ्या स्थानीं सांगितलेला क्रियाक्रम विचारांत घेतल्यास, खोकल्यांतून पडणारा कफ, वांतींतून पडणारे पित्त अधोमार्गानें सरणारा वायु म्हणजे आयुर्वेदांतील त्रिदोष नसून, प्रत्येक अणुतील संग्राहक किंवा आकर्षक शक्तिसंपन्न भाग म्हणजे कफ, पाचक किंवा विभाजकसामर्थ्ययुक्त भाग म्हणजे पित्त आणि गति उत्सर्जनाचें सामर्थ्य असलेला अणुभाग म्हणजे वायु त्याचप्रमाणे, संग्रह, पचन, उत्सर्जन, किंवा पोषण, पृथक्करण, उत्सर्जन, याशिवाय चवथी क्रिया नाहीं म्हणूनच दोपांची त्रयी प्रचारांत आली केवळ या संख्येच्या आवडीमुळे नव्हे अशी खात्री होऊन आयुर्वेदाचे तत्वज्ञानाकडे उपहासबुद्धीऐवजीं सादरबुद्धि नाहीं तरी निदान जिज्ञासबुद्धि वळल्यास आयुर्वेदीयांनी स्विकारलेला,

विसर्गादानविक्षेपै सोमसूर्याऽनिला यथा ।
धारयंति जगद्देहं कफपित्तानिलास्तथा ॥ १ ॥


हा सिद्धांत भ्रामक, काल्पनिक, अज्ञानमूलक न वाटतां सत्य असाच वाटेल.

________
त्रिदोषांचा निदानाविषयीं उपयोग ?

 त्रिदोषांच्या तात्विक स्वरूपाचा बोध झाल्यावर त्यांचा निदान आणि चिकित्सा यांमध्ये कसा उपयोग करावयाचा हा विचार कर्तव्य आहे. वैद्यशास्त्राचें सर्व विवेचन चिकित्सेच्या सुलभतेसाठी असतें आणि चिकित्सा रोगाची; अर्थात् निदान व चिकित्सा हींच वैद्यशास्त्राची मुख्यांगे झाली. रोगाचें नक्की ज्ञान व खात्रीचे उपाय यांसाठी सर्व विवेचन आहे. ( व्याधेस्तत्वपरिज्ञानं वेदनायाश्च निग्रहः । ) आयुर्वेदाच्या सर्व विवेचनाचे तत्त्व त्रिदोष आहेत अर्थात् त्यांचा