पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५८
आयुर्वेदांतील मूलतत्वे.

 निदान चिकित्सेचे कामी उपयोग झाला पाहिजे नाहीपेक्षां त्रिदोषवर्णन हें शब्दशास्त्राचें एक विनोदी स्वरूप होईल. आयुर्वेदानें कफपित्तानिलांना दोष हें नांव देऊन हेच शरीर दूषित करतात, (दूषणात् दोषाः ) रोगकर्तृत्व त्यांचेकडेच आहे असा उद्देश प्रथमदर्शनीच स्पष्ट केला आहे. त्याचप्रमाणे-

दोषा एव हि सर्वेषां रोगाणामेककारणं । (वाग्भट. )
वातादि दोषच सर्व रोगांचे मुख्य कारण आहेत.
सर्वेषामेव रोगाणां निदानं कुपिता मलाः । वाग्भट )

  सर्व रोगांचे निदान म्हणजे उत्पादक कारण कुपित झालेले दोष होत.

विकारजातं त्रिविधं त्रीन् दोषान्नातिवर्तते ॥ (वाग्भट)

 तीन प्रकारचे रोग (सर्व) वातादि तीन दोषांशिवाय होत नाहींत.

प्रतिरोगमिति क्रुद्धा रोगाधिष्ठानगामिनीः॥
रसायनी: प्रपद्याशु देोषा देहे विकुर्वते ॥ १ ॥ ( वाग्भट )

 याप्रमाणें क्रुद्ध झालेले दोष रोगस्थानगत अशा ज्या रसायनी ह्मणजे सूक्ष्मवाहिनी त्यांचे ठिकाणी जाऊन शरीरांत विकृति उत्पन्न करतात.

त एव व्यापन्नाः प्रलयहेतवः ( सुश्रुत. )

 तेच बिघडले असतां प्रलय म्हणजे नाश ( रोग आणि मरण. )करतात.

विकृता देहं घ्नंति । ( वाग्भट. )

 विकृत झाले असतां देहाचा नाश करतात.
 इत्यादि अशा प्रकारची अनेक वाक्ये आहेत कीं त्यांवरून आयुर्वेदीयांनी सर्व रोगांचे कर्तृत्व वातादि त्रिदोषांकडेच सांगितले असल्याचें स्पष्ट होते. सर्व शरीराच्या अनेक क्रियांचा अंतर्भाव विसर्गादानविक्षेपरूपी तीनच क्रियांत होतो व त्याच तीन क्रियांमध्ये वैषम्य आले असतां रोगोद्भव होतो. यावरून नित्य व्यापारांप्रमाणे रोगकर्तृत्वहि तत्वतः त्रिदोषांकडे सांगावें हें ओघानेच प्राप्त झाले. पण याप्रमाणे तत्वतः त्रिदोष रोगकारक मानल्यावरहि अनेक रोग आणि त्यांच्या अनेकविध अवस्था यांचें नक्की ज्ञान त्रिदोषांनीं कसें होतें ?
 कांहीं विकार शरीराच्या एखाद्या भागांतच असतात तर कांहींचा संबंध अनेक भागांत असतो. सूज, गुल्म, व्रण इत्यादि विकार एका भागांतील तर ज्वर, कुष्ठ, संधिवात, सर्वांगाची सूज इत्यादि अनेक शरीरावयवांचे विकार होत. या विकारांना अनुक्रमें स्थानी आणि सार्वदेहिक अशी नावे देतां येतील. एकाद्या विकारांत अनेक उपद्रव