पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६१
रोग म्हणजे काय ?

 पाहिजे. म्हणजे आर्धी संचय व मग उन्मार्गप्रवृत्ति असा क्रम प्राप्त होतो. व तो तसाच सांगितलाही आहे.
 शरीराच्या रोगी अथवा निरोगी अवस्थांचा विचार करीत असतां त्याचा सर्वसामान्य धर्म किंवा स्वाभाविक सामर्थ्य गृहीत मानणे अवश्य असते. ज्याप्रमाणे त्या त्या शारीरभागांतील नित्याच्या क्रिया विशिष्ट ठिकाणी या नैसर्गिक सामर्थ्यानें चालतात त्याचप्रमाणें रोगी अवस्थेमध्येहि दूषित पदार्थ किंवा दोष ह्यांच्या उन्मार्ग अवस्थेतहि त्यांचा विशिष्ट मर्यादेपावेतो त्रास न व्हावा अशा प्रकारचें सामर्थ्य मानावें लागते. तोंपर्यंत वाढलेल्या दोषाला शरीर सहन करूं शकते. व ह्या सामर्थ्याबाहेर वाढ झाली की, त्याचा त्रास होऊ लागतो. व त्याला प्रतीकार सुरू होतो. ' रोग म्हणजे एक प्रकारें विकृतीचा प्रती- कार होय;' एकाद्या ठिकाणी रोग होतो म्हणजे त्या ठिकाणी रोगोत्पादक विकृतीला प्रतीकार सुरू होतो. कांहीं विकारांत शरीराची प्रतीकारी शक्ति रोगाला पुरी पडून त्याचा नाश वरूं शकते तर कांहीं रोगांमध्ये ही शक्ति अपुरी पडून रोगनाशाला बाह्योपचारांची अवश्यकता असते. आणि याच कारणासाठी चिकित्साशास्त्राची अवश्यकता निर्माण झाली. कित्येक रोगांची स्थिति अशी असते कीं, एकाद्या ठिकणीं नैसर्गिक क्रियांमध्ये वैषम्य उत्पन्न होऊन त्याच ठिकाणी रोग होतो परंतु कांहीं विकारांमध्ये एका ठिकाणी विकृति सुरू होते परंतु तेथे प्रत्यक्ष असें रोगरूपी कार्य न घडतां क्रियाकारी जे वातादि पदार्थ त्यांची उन्मार्गप्रवृत्ति इतर भागांत हाऊं लागते व असा प्रकार होत असतां जेथे या उन्मार्गप्रवृत्त दोषाला-क्रियावान् पदार्थाला- प्रसारांत व्यत्यय उत्पन्न होतो त्या जागी रोगाला स्पष्ट रूपता येते. रोगपरीक्षा करीत असतां रोगाचे ज्ञान म्हणजे उन्मार्गप्रवृत्त दोषाचा स्थानसंश्रय म्हणून सांगितलें आहे त्याचा आशय हाच होय. संप्राप्तीचे लक्षण सांगतांनाहिः-

यथादुष्टेन दोषेण यथा चातुविसर्पता ॥
निर्वृत्तिरामयस्यासौ संप्राप्तिः । ( माधवनिदान, बाग्भट )

  दोष होऊन व त्यांचा प्रसार होऊन एकाद्या दोषानें जी रोगाची ( एकाद्या जागी) उत्पत्ति होते. तिला संप्राप्ति ह्मणावयाचें असें सांगितलें आहे.

 त्याचप्रमाणे:-

संचयं च प्रकोपं च प्रसरं स्थानसंश्रयं ॥
व्यक्ति भेदं च यो वेत्ति दोषाणां संभवेद्भिषक् ॥ १ ॥

( सुश्रुत. )