पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६३
रोग म्हणजे काय ?

 कार्य व कार्यकारी गुण अथवा अंश यांविषयीं प्रथम ज्ञान असावयास पाहिजे.
 वाढ, प्रकोप किंवा उन्मार्गप्रवृत्ति आणि स्थानाश्रय हे मानतांच अर्थात् हे दोन पदार्थ असावयास पाहिजेत हैं ओघानेंच प्राप्त होतें. पदार्थाशिवाय उन्मार्गप्रवृत्ति आणि प्रसार कशाचा होणार ? अतिरिक्त वाढून दूषित स्वरूप आल्यावर त्यांना दोष हें नांवहि सार्थ होते. त्यापूर्वी प्रमाणस्थित शुद्धस्थिति ही दोषवाचक नसून ती देहधारक अवस्था असते, आणि याकरतांच यांना समस्थितीत धातु हें नांव योग्य आहे. शास्त्रीय व्यवहाराचे सोयीसाठीं दिलेले दोष हैं नांव नेहमीच वापरण्यांत येतें. अशा रीतीनें दूषित झालेल्या वातादींना मल हें नांवहि क्वचित् योजण्यांत येतें. कारण, या अवस्थेत शारीरधातूंना मलिन करणें व टाकाऊ किंवा उत्सर्जनीय स्वरूप पावणे हे गुण ( दुर्गुण ) त्यांत उद्भवतात.

सर्वेषामेव रोगाणां निदानं कुपिता मलाः ।

 कोणत्याहि ठिकाणी रोग अथवा रोगात्मक विकृति व्हावयाची म्हणजे एकादा दोष वाढतो. वाढ झाल्यावर मग त्याचा प्रसार इत्यादि होतात. ह्मणजे, कोणत्या तरी दोषाच्या वाढीशिवाय रोग होत नाहीं है उघड होय. वाढीचा परिणाम रोगरूपाने होतो म्हणून वाढीच्याच अवस्थेत दोषाचा प्रतीकार करून कोपादि अवस्था उद्भवण्याचे टाळावें असा अभिप्राय आहे. " चय एव जयेद्दोषं" चयाचे अवस्थेतच दोषाला जिंकावा त्याचप्रमाणे, मुख्यत्वें उपचार सांगत असतां शोधन व शमन हेच प्रकार सांगितले आहेत. "शोधनं, शमनं चेति समासा दौषधं द्विधा ।" शोधन व शमन या भेदानीं औषध मुख्यतः दोनच प्रकारचे आहे. (अ. हृ.) आणि हे दोन प्रकार लंघनाचे आहेत."

शोधनं शमनं चेति द्विधा तत्रापि लंघनम् ।

शोधन व शमन या भेदांनीं लंघन दोन प्रकारचें आहे. शोधन म्हणजे वाढलेल्या दोषांना शरीराबाहेर काढून टाकणे व शमन ह्मणजे प्रत्यक्ष बाहेर न काढता विषमता घालविणे. चिकित्सा सांगत असतां आयुर्वेदीय ग्रंथांत बृंहण व लंघन असे दोन प्रकार सांगण्यांत आले आहेत.

उपक्रम्यस्य हि द्वित्वाद्दद्विधैवोपक्रमो मतः ।
एकः संतर्पणस्तत्र द्वितीयश्चापतर्पणः ॥ १ ॥
बृंहणो लंघनश्चति तत्पर्यायावुदाहृतौ ।
बृंहणं यद् वृहत्वाय लंघनं लाघवाययत् ॥
देहस्य भवतः ॥