पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६५
रोग म्हणजे काय ?

 सूक्ष्मता जाऊन स्थूल द्रव्याश्रयी अशी त्यांची वाढ होते त्यावेळीं दोष हे दोष होतात. या दृष्टीने विचार करतां ध्यानांत येईल कीं, कफाच्या अनेक गुणांमध्ये वर्गीकरण केल्यास, शीत आणि स्निग्ध असे दोन भाग त्यांत मुख्य दिसतात, गुरु, मंद इत्यादि गुण स्निग्ध गुणाचे अनुषंगी आहेत. या दोन प्रकारच्या श्लेष्मगुणांमध्ये शीत हा गुण सूक्ष्म आणि शक्तिस्वरूप आहे तितका स्निग्ध नाहीं. स्निग्धगुणाची प्रतीति स्थूलाश्रयी आहे. आणि संघटना किंवा संग्रहाचें दृश्य कार्य याच पदार्थाश्रयी गुणाने व्हावयाचें. व ज्यावेळीं कफाची रोगकारी वाढ होते त्यावेळी याच गुणाची वाढ अधिक प्रमाणांत होत असते. पित्ताचेहि असेच दोन भाग पडतात. एक उष्णगुणप्रधान, आणि दुसरा तीक्ष्णगुणप्रधान. उष्णता आणि तीक्ष्णता. तीक्ष्णता हा गुण द्रव अशा आम्लाचा आश्रयी असतो. पित्ताचे गुणांमध्ये एक उष्णता व द्रव अम्ल, तीक्ष्ण इत्यादि गुण हे द्रवपदार्थाश्रयी तीक्ष्ण अम्लाचे आहेत. या दोन प्रकारांत उष्णता सूक्ष्मद्रव्याश्रयी आणि द्रवाश्रयी तीक्ष्णता त्यामानाने स्थूल हैं उघडच आहे. मात्र कफाचें संग्रहात्मक कार्य स्निग्धगुणाने घडते त्याचप्रमाणे पित्ताचं पचनात्मक कार्य याच द्रवाश्रयी गुणाने प्रत्यक्ष घडून येते. सामर्थ्य हें सूक्ष्मपदार्थाश्रयी असतें आणि विकारकारी अवस्था दूषित अवस्था स्थूल पदार्थात उद्भवते. वायु हा पदार्थ सूक्ष्म आहे. तरी देखील त्यामध्ये दूषित अवस्था उद्भवते याचा अर्थ त्यामध्ये विरळपणाची मर्यादा कमी होते. त्याचे कार्य अथवा धर्म गति हा आहे. व म्हणूनच त्याची विकारकारी अवस्था म्हणजे संचारांत अंतराय म्हणून सांगण्यांत आला आहे. गतिस्वभावी वायूचा संचय व्हावयाचा म्हणजे तो एखादे जागीं कोंडला जावयाचा हा अर्थ उघड आहे. रोगकारी संचयाचें स्वरूप ध्यानांत घेतांना कफाची शीतलता, पित्ताची उष्णता किंवा वायूची गति यांचा संचय नसून कफाची स्निग्यता, पित्ताची तिक्ष्णता आणि वायूचा अणुसमुदाय यांची वाढ रोगकारी होते; अर्थात शीतता, उष्णता अथवा गति हे धर्म ते ज्या सूक्ष्म अणूमध्ये असतात असे सूक्ष्म पदार्थ बिघडणारे नाहीत तर त्यांचे स्थूल स्वरूप दुष्ट होते व इतर पदार्थांना दूषित करतें. कफपित्तानिलांच्या नित्यव्यापारांत, स्निग्धता किंवा संग्राहक पदार्थ, पाचक पदार्थ किंवा उष्णता, आणि गति यांर्चे दूषित स्वरूप म्हणजे स्निग्धतेचा अतिरेक अभिष्यंद, उष्णतेचा अतिरेक अभिताप आणि गतीचा एकाच ठिकाणी अतिरेक म्हणजे क्षोभ अशी नांवें त्यांना दोषी स्थितीत प्राप्त होतात. यांचे स्पष्ट अर्थ - अभिष्यंद ह्मणजे अतिसंचय, ओलसरपणा अभिताप, - - दाहात्मक उष्णता, अक्षोभ - फाजील ताण असे समजावे.