पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६६
आयुर्वेदांतील मूलतत्वें.

  प्रत्येक विकारांतील त्रिदोषांचा संबंध म्हणजे विकार अभिष्यंदजन्य आहे, अभितापजन्य आहे कीं क्षोभजन्य आहे यांचा बोधक समजावयाचा.

शूलं नर्तेऽनिलाद्दाहः पितात् शोफः कफेोदयात् ॥

 "शूलं वायूशिवाय नाहीं, दाह पित्ताशिवाय नाहीं आणि सूज कफाशिवाय नाहीं. असा सिद्धांत याच अर्थाचा आहे. अनेक विकारांतील अनेक लक्षणांचा तत्वतः या तीनच मुख्य लक्षणांत अंतर्भाव होतो. कोणताही विकार यांपैकींच एका अथवा अनेक अवस्थांमुळे होतो. आणि याच कारणाने सर्व रोगांमध्ये त्रिदोषांचा संबंध येतो श्लेष्मजन्य, पित्तजन्य, वातजन्य यांचा अर्थ अभिष्यंदापासून, दाहापासून अथवा क्षोभापासून झालेला विकार असा असतो. कित्येक विकारांमध्ये धातु म्हणजे रसरक्तादि पदार्थांचा त्याचप्रमाणे मलमूत्रांचा संचय होतो, परंतु हे संचय होण्यालाही वरील तीहींपैकीं एकाद्या अवस्थेची अवश्यकता असते. आणि यासाठी रोगस्थान व त्यांतील धातु वगैरे पदार्थांची विकृती समजली तरी तिचें कारण, अभिष्यंद, अभिताप की क्षोभ हें कळावे म्हणून निदानशास्त्रांत तत्त्वतः त्रिदोषज्ञानाला महत्त्व देण्यांत आले आहे.
 केवळ दोषज्ञान निदानांत पुरे होणारे नसून धातूंचा व रोगस्थानाचा विचारहि अवश्य आहे. हें प्रत्येक रोगाची संप्राप्ति पाहतां ध्यानी येईल. धातु आणि मळ यांचा कफपित्तादिकांशी संबंध निश्चित करण्याकरतां दोषदृष्य संबंध सांगण्यांत आला आहे. दोष व दृष्यें हीं परस्पर साधर्म्ययुक्त असतात. दोषांचे जे गुण ते ज्या धातूंत अधिक ते त्या दोषांचे दूष्य ह्मणजे विशेषतः दूषित होणारे पदार्थ. एकदां शरीर विकृत झाल्यावर मग सामान्य नियम उल्लंघिले जाऊन कोणत्याहि धातूंमध्ये कोणत्याहि दोषांची विकृति होऊं शकते. परंतु प्रामुख्याने अधिक प्रमाणांत व प्रथम होणारी विकृति या दोषदृष्यां मध्ये होते. क्रियाकारी असे जे सूक्ष्म दोष त्यांचे हे दृष्य धातु आधारभूत असतात. म्हणून त्यांवर प्रथम परिणाम होतो.
 रोगपरीक्षा करीत असतां महत्त्वाची गोष्ट ह्मणजे रोगस्थानीय नित्य क्रिया आणि त्यांचे कर्तृत्व असलेल्या दोषांच्या अंशाचे ज्ञान ही होय. एकाद्या दोषाने एकाद्या ठिकाणी रोग झाला अशा शब्दसमुच्चयानें रोगस्थानीय अशा नित्य क्रियांतील विक्रियेचा स्पष्ट खुलासा झाला पाहिजे तरच त्रिदोषांचा निदानशास्त्रांत उपयोग होतो असें म्हणतां येईल. स्पष्टीकरणासाठी एकदोन उदाहरणे घेऊ.


________