पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६८
आयुर्वेदांतील मूलतत्वें.


त्वचा व उत्पादक दोष पित्त येवढे कळून भागत नाहीं; कारण त्वचेंत पित्त किंवा उष्णता वाढण्याने ज्वराशिवाय इतरहि पैत्तिक विकार होणें संभवनीय आहे. दाह, उदर्द, त्वक्पाक, कुष्ठ, व्यंग, नीलिका इत्यादि अनेक विकार त्वचेमध्येच होणारे आणि त्यांचें कारण-उत्पादक- पित्तच. मग ज्वरोत्पादक पित्त कोणते आणि कोणत्या अवस्थेचें ? ज्या अर्धी दाहोत्पादक पित्त वाढले असतां दाह होतो पण ज्वर नाहीं, दाहांत उष्णता वाढली ती रोग्याला कळते, असह्य दाह होतो पण त्वचेवर उष्णतामान वाढलेले दुसऱ्याला स्पर्शानें कळत नाहीं. ज्वरांत दाह नसेलही पण थोडयाफार प्रमाणांत उष्णतामान वाढावयाचेंच. ही उष्णता कोठून येते याचे उत्तर आयुर्वेदानें दिलें तें असें अव्यवस्थित आहार वगैरेनी आमाशयांत दोषांचा प्रादुर्भाव होतो. दोष आमाशयाचा आश्रय करतात. आमाशय या शब्दाचा अर्थ लध्वंत्रे किंवा पच्यमानाशय असा आहे. (मागें खुलासा आहेच आणि सदर पुस्तकांत विवेचनाचे सोयीसाठी पच्यमानाशय याच शब्दानें लघ्वंत्रे संबोधिली आहेत. ) पच्यमानाशयांत दोष उत्पन्न होतात अथवा प्रवेश करतात याचा अर्थ काय ? दोष शब्द बहुवचनी अर्थात् तीनहि दोष असावयास पाहिजेत पच्यमानाशयामध्ये तीन दोषांची विकृति एकदम होते काय ? आहा राचे अनियमितपणाने पचनाचे कार्य विकृत झाले म्हणजे अर्थातच तीन दोषांच्या पच्यमानाशयांतील क्रिया विकृत होतात. अन्नाचे पचन, अन्नरसाचा संग्रह व वियोजन नीट होत नाहीं. पचन व अन्नरसाचें वियोजन हीं कायें कमी होतात व आंतड्यामध्ये अन्नाचा संग्रह अधिक-अधिक काल पावेतों होतो. ह्मणजे विसर्गादानविक्षेप किंवा संयोग विभाग वियोग या क्रियांमध्ये अव्यवस्थितपणा प्राप्त झाला व त्यामुळे दषा: हें बहुवचन सार्थ आहे. अशा प्रकारें जर आमाशयांत एका अव्यवस्थित आहारविहारामुळे तीनहि दोषांच्या क्रिया विकृत झाल्या तर ज्वरोत्पादक विकृति तीनहि दोषांनी उत्पन्न केली असें म्हणावें लागेल. व ज्वर हा रोग सांन्निपातिकच मानावा लागेल. पण तसा तो मानला नाहीं. त्यामध्ये एक दोषी, द्विदोषी सान्निपातिक असे भेद सांगितले आहेत. अर्थात् ज्वरारंभक दोष एक असतो, हें उघड होतें. शिवाय आमाशयांत दोषविकृति झाली ती तीन दोषांची झाली तरी कोप अथवा उन्मार्गात्रस्था कोणत्या कोणत्या दोषांत उत्पन्न होऊन ज्वर उत्पन्न होतो हा प्रश्न तसाच राहतो उन्मार्ग प्रवृत्त जो दोष तोच रोगकारी असतो. " सर्वेषामेत्र रोगाणां निदानं कुपिता मलाः ॥” या वाक्यांत कुपित दोषच सर्व रोगांचें कारण सांगितलें आहे आणि कोप ह्मणजे उन्मार्गगामित्व होय.