पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१८५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७२
आयुर्वेदातील मूलतत्वे.

 झिरपत असतो. अशा रीतीनें त्रिदोषपद्धतीला अनुसरून पाहतां ज्वरारंभक विकृती म्हणजे प्रथमतः आमाशयांतील पित्ताची उन्मार्गप्रवृत्ति असा अर्थ अभिप्रेत असल्याचे दिसून येतें. त्यानंतर ह्या उन्मार्गप्रवृत्त पित्तासंबंधी असा प्रश्न उपस्थित होतो कीं, ह्याचा संचय झाला असतो काय ? कारण आधीं संचय व मग प्रकोप असा सामान्य क्रम आहे. आणि पित्ताचे स्रावाला अडथळा झाला म्हणजे त्याचा स्वतःच्या स्रोतसांमध्ये संचय होतोच. यथामार्गप्रवृत्ति कांहीं काळापुरती बंद झाली अर्थात् स्थानी वाढ ) उत्सर्जनाभावी. ) झाली याचेच नांव संचय. 'चयोवृद्धिः स्वधान्येव, ( अ. हृ.) स्वतःचे स्थानांत वाढ म्हणजे चय समजावा. कांहीं काल चय झाल्यावर मग अयथामार्गाकडे प्रवृत्ति होते व तो कोप. अशा प्रकारें पित्ताचा संचय व कोप यांविषयीं उलगडा होतो. त्यानंतर प्रश्न उद्भवतो कीं, हें उन्मार्ग प्रवृत्त पित्त त्वचेतच रोगकारी कां व्हायें ? रसानुगामी झाल्यावर प्रथम त्याचा यकृतांत ( प्लीहेत हि ) प्रवेश, नंतर हृदयांत मग रसवाही धमनीत व मग सर्व लहानमोठ्या वाहिनीत असे असल्याने या पित्तानें यकृत्, हृदय, रसवाहिनी यांत एकादा विकार उत्पन्न न करतां त्वचेतच का करावा ? याचें कारण असें कीं, ज्यावेळीं आंतड्यांतील पित्ताचे प्रमाण या सर्व प्रसारमार्गातून उत्सर्जित होण्यासारखे असतें आणि हीं सर्व स्थानें स्वसामर्थ्याने या पित्ताला आपल्यांतून बाहेर टाकण्याला समर्थ असतात त्यावेळी कोणत्याहि ठिकाणी त्याचा परिणाम न होतां सर्व शरीरभर तें परसतें. परंतु हा अनैसर्गिक, विजातीय असला पित्तरूपी पदार्थ सर्व भागांतून फिरून ज्यावेळी रक्ताचे मळाबरोबर त्वचेत म्हणजे स्वेदामध्ये येतो त्यावेळी त्वचेतील सूक्ष्म अशा स्वेदवाहिनीतून त्याचें उत्सर्जन होत नाहीं. याचेहि कारण असे घडलें असतें कीं आहाराचें गुरुत्वामुळे त्याचप्रमाणे पित्ताचे मिश्रणाच्या न्यूनत्वामुळे अन्न अजीर्ण राहते अर्थातच जो थोडाफार अन्नरस तयार होतो (कोणतीहि क्रिया पूर्णपणे नष्ट होत नाहीं. ती कमी अधिक प्रमाणांत कमी होते. ) तोहि अपक्व असल्याने त्यामध्ये स्निग्धता, घनता, साम्लता अधिक असते व असल्या अन्नरसाने इतर शरीरभागांपेक्षां सूक्ष्म असलेली त्वचेतील स्रोतसे अवरुद्ध होतात. हें जें स्थानी वैगुण्य त्यामुळे त्यांतून नित्याचेच वेदोत्सर्जन होईनासे झालेलें असतें. व त्रिमार्गप्रवृत्त पित्तहि इतर शरीरभागांतून प्रसार पावत या ठिकाणी आले म्हणजे स्वाभाविकपर्णेच त्याचा अटकाव होतो. यालाच स्थानसंश्रय नांव आहे. हें त्वचा या स्थानांत संश्रित झालेले पित्त, नित्याची त्वचेतील उष्णता आणि त्याचबरोबर नित्याच्या उत्सर्जनक्रियेत व्यत्यय आल्याने संचित झालेले स्वेद - बाष्प-रूपी द्रव्य या सर्व उष्ण पदार्थांचा अनैसर्गिक जो संचय