पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७६
आयुर्वेदातील मूलतत्वें

 शीतता वाढते. उष्ण गुण पित्ताचा वाढतो त्यावेळी मात्र वायूचा रूक्ष गुण वाढला असल्यास क्षोभ अधिक व गती अधिक असते, पण या गतीचा उपयोग उन्मार्गप्रवृत्तीलाच संवर्धक असतो. व म्हणूनच वातपित्तजन्य रोगांत पित्ताचीं लक्षणें अधिक व क्षोभकारी वायु मदतगार आणि वातकफजन्य विकारांत शैत्यकारी कफाचीं लक्षणें अधिक व हीनगतिक वायु शीत रूपाने मदतगार अशी स्थिति असते. या कारणांमुळेच—

योगवाहः परं वायुः संयोगादुभयार्थकृत् ॥
दाहकृत्तेजसा युक्तः शीतकृत्सोमसंश्रितः ॥ १ ॥

 वायु हा योगवाही असून संयोगानें उभयविध कार्ये करणारा आहे. तो पित्ताशी संयुक्त झाला की दाह व कफाशी संयुक्त झाला की शैत्य करतो. या दोनहि अवस्था मानण्याचे कारण असें असतें की, वायूचे संयोगावरून वाढलेल्या रुक्षतेचा बोध होऊन उपचारांत स्निग्धतेची मदत मिळावी. यानंतर संनिपात हा भेद आहे. संनिपात ह्मणजे तीन दोषाची वाढ. याविषयी मागील खुलासा ( संसर्ग आणि संनिपात ) ध्यानात घेणं जरूर आहे. संनिपात शब्दाने समकालीन क्रियावैषम्य घ्यावयाचे याविषयीं मांगें सांगितले आहे. ज्वरामध्ये संनिपाताची कल्पना अशी संभवते की, एकाच वेळीं विदाही व स्निग्ध पदार्थांनी विदाही पित्त व स्निग्ध कफ यांची वाढ व स्निग्ध पदार्थरूपी कफानें भरलेल्या स्रोतसांतील नित्याच्या संचाराला व्यत्यय उत्पन्न झाल्यानें विरुद्ध मार्गानें वायूची गति क्षोभक होणे. याला प्रतीलोमन नांव आहे. म्हणजे यांत वायूचीहि उन्मार्ग-प्रवृत्ति असते. वायूची गति तीक्ष्ण, क्षोभक पदार्थोंनी पित्ता बरोबरच वाढलेली असते.
 या एकंदर सात प्रकारांतील दोष तत्वानुसार फरक असाः---
 १ वाताधिक - रूक्षता प्रधान. २ पित्ताधिक-दाहप्रधान. ३ कफाधिक स्निग्धता - अभिष्यंद प्रधान. ४ वातपित्ताधिक- रूक्षता जन्य शूल, व पित्तजन्य दाहप्रधान. ५ वात कफाधिक-शैत्य व शूल प्रधान. ६ कफपित्ताधिक, स्निग्धता-अभिष्यंद- दाहप्रधान ७ संन्निपतिक दाह, अभिष्यंद शूलप्रधान.
 ज्वरांत निरनिराळ्या शरीरभागांत होणारी लक्षणे या मुख्य धोरणाला धरून होतात म्हणजे पूर्वी सांगितल्याप्रमाणें व युपित्त कफांच्या नैसर्गिक शरीरोपयोगी क्रियांच्या अनैसर्गिक स्वरूपाच्या क्रिया ज्या अनुक्रमें क्षोभ, अभिताप व अभिष्यंद - त्यांतील एक दोन अथवा तीन याप्रमाणे हे बोधक भेद होत. संनिपाताचे अनेक भेद हे यामुख्य लक्षणांचें न्यूनाधिक्य व निरनिराळ्या स्थानांवरील परिणामाचे