पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१९

हे पान प्रमाणित केलेले आहे.
आयुर्वेदातील मूलतत्वे.

झाला असला तथापि सध्याच्या ज्ञानयुगांत या पडद्याआड लपलेलें अज्ञान उघडकीला आल्याशिवाय रहात नाही. असल्या प्रकारच्या विचारसरणीनें आयुर्वेदाचा अनादर होऊ लागला तरीपण आयुर्वेदातील शेकडों औषधिकल्प निरनिराळ्या विकारांवर अचुक काम देतांना पाहून आपण केलेले हे अचुक विधान कदाचित् चुकीचे असेल काय ? अशी शंका बहुतेकांना येतेच. आणि ही शंका सोडविण्यासाठी जी युक्ति स्वीकारण्यांत येते ती मात्र मोठी मनोहर आहे. आयुर्वेदांत औषधे फार चांगली आहेत, व अशा गुणकारी औषधांच्या योजनाहि पुष्कळ आहेत. पण आयुर्वेदाची निदानपद्धति सशास्त्र नाही. हे विधान करणारे लोक आत्मवंचना मात्र करून घेतात. कारण औषध चांगले म्हणजे काय? ज्या विकारावर योजण्यासाठी तें तयार केले त्यावर त्याने गुण दिला पाहिजे ना ?. ग्रंथकाराने महारास्नादि काढा लिहिला तो जर चांगला असेल तर त्याने ज्या वातविकारासाठी तो लिहिला ते विकार नाश पावले पाहिजेत. नाहीपेक्षा चांगला असे म्हणता येणार नाही. औषध सांगणाराला जर विकाराची माहिती नाही तर त्या विकारासाठी औषध योजलें कसे आणि ते गुणकारी होते तरी कसें ? कदाचित् दैवयोगाने आणि काकतालीय न्यायाला अनुसरून काय ? आयुर्वेदातील सर्व औषधे काकतालीय न्यायानेच गुणकारी होतात असें म्हणण्याचे साहस अगर अप्रयोजकपणा ज्याला थोडातरी सारासार विचार आहे असा मनुष्य केव्हांच करणार नाही. औषध चांगले योजणाराला रोगाचे ज्ञानहि चांगल्या प्रकारचे असलेच पाहिजे. आणि आयुर्वेदांत ते आहे म्हणूनच आयुर्वेदांतील औषधीकल्प उत्तम ठरतात. आयुर्वेदीय औषधी यथोक्त गुण देत नाहीत हे ठरविण्याची कोणाची तयारी आहे काय ? योजकाचे अज्ञानाने योजना नीट न झाली आणि गुण आला नाही तर औषधाचे गुणकारित्वाला किंवा औपध सांगणाऱ्या शास्त्राला बिलकुल बाध येत नाही. हे सर्व खरे आहे; तरी सांप्रतकाळी आयुर्वेदाविषयी सर्वसामान्य जनसमूहांत विशेष आदर नाही ही गोष्ट खरी आहे. आणि याला कारणे जरी अनेक आहेत, तरी मुख्य कारण म्हणजे आयुर्वेदाचे रहस्य सहज कळण्यासारखें विशद नाही आणि परंपरा इ. मुखांनी भलत्या कल्पनांना अवसर दिला हेच होय. आयुर्वेद ज्या त्रिदोषतत्वांवर अवलंबून आहे ते त्रिदोष म्हणजे काय ? आणि त्यांचा निदानचिकित्सेंत उपयोग कसा होतो ? या तत्वांनी आयुर्वेदाचे उद्दिष्ट साध्य होईल किंवा नाही याचा विचार प्रस्तुतकाळी अवश्यक झाला आहे. प्रचलित आक्षेपकांचे मताप्रमाणे प्राचीन आचार्यानी आपल्या अज्ञानावर टाकलेला हा पडदा आहे की, आयुर्वेदाची सूत्रं ज्यांत प्रथित केली आहेत असा