पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८३
उदर.

  आहार्य पदार्थांनी - रसांनी- दोष दूषित होऊन, धातूंना दूषित करून दोष व धातु दोघे मळांना बिघडवितात.
 म्हणजे सर्व विकारांमध्ये मुख्य प्रकार तीन होतात; एक दोषविकृतिजन्यः दुसरा, धातुविकृतिजन्य आणि तिसरा मलविकृतीजन्य. धातु व मळ यांमध्ये तत्वतः दोषांचेंच कर्तृत्व असल्याकारणानें या तीनहि प्रकारांत तत्वतः त्रिदोषांचाच संबंध येतो. परंतु विकाराची व्याप्ति ध्यानी येण्यासाठी असे पोटभेद मानणे सोयीचें आहे. त्याचप्रमाणें प्रत्येक ठिकाणांतील क्रियांमध्ये तीनहि दोषांचा संबंध येत असला तरी, उत्सर्जन वायूमुळे, पृथक्करण पित्तामुळे व उत्पादन, (संग्रहाची अवस्था ) कफामुळे, असल्यानें या तीन प्रकारच्या विकारांमध्ये अनुक्रमे वायु, पित्त आणि कफ यांचे प्राधान्य असतें.
त्रिदोषांचे तारतम्य ओळखणें हेंहि निदानांतील एक मुख्य अंग आहे. त्याचप्रमाणे मिश्र दोषांमध्ये स्वतंत्र उत्पादक, व मदतगार हाहि विचार महत्त्वाचा आहे. कफ वाढून वायूंचे मार्गांत त्याचा व्यत्यय आला तर विकार वायूचा होईल. पण उपचार वाढलेल्या कफावरच करणें अवश्य असतें.
 कारण चिकित्सेचें तत्व वैषम्य घालवणें हें असून वैषम्याचें कारण दूर करणें अवश्य. यासाठीच वाढ आणि मार्गसंरोध व कोप यांना महत्त्व आहे. वाढीशिवाय मार्गसंरोध नाहीं. कफाच्या स्निग्धादि गुणांची पित्ताच्या तीक्ष्णतेची अथवा वायूचे रूक्षतेची कोणती तरी वाढ पाहिजे खास. व कोणत्याही रोगामध्ये नक्की ज्ञान हेंच पाहिजे की, वाढ कोठे आणि कोणत्या दोषांची झाली आहे. आयुर्वेदाचे सर्व रोगनिदान पाहिल्यास त्यांत कोप कसा कोठे व कोणत्या दोषाचा झाला आहे याचाच उल्लेख केलेला आढळेल. व हा कोप समजून घेतांना त्या स्थानांतील दोष दूष्यांचा संबंध व नित्यक्रिया या सर्व ध्यानी घेऊन कोपाचें स्वरूप ठरविले तरच रोगाचें स्वरूप समजेल. केवळ वायुपित्तकफांच्या ढोबळ माहितीवर निदान होणार नाहीं. निरनिराळ्या शरीर विभागांतील नित्याची कार्ये त्रिदोषांचे सहाय्याने कशी घडतात ही कल्पना ध्यानी घेतली म्हणजे रोग अथवा विकृतीची कल्पनाहि नीट येईल. त्रिदोषांचें असे निरनिराळ्या रचनांतील निरनिराळ्या अंशांनीं घडून येणारें कार्य ज्ञान म्हणजे इंद्रियविज्ञान होय.
 आयुर्वेदांत स्वतंत्रपणे इंद्रियविज्ञान नाहीं. आणि सकृद्दर्शनीं ही वैद्यशास्त्राची मोठी उणीव वाटते व असली महत्वाची उणीव असणारा आयुर्वेद शास्त्रीय वाटत नाहीं. आणि इंद्रियविज्ञानाचें अभावीं इंद्रिय कृती स्वरूपी रोगांचें ज्ञान अशक्य असल्याने आयुर्वेदाची निदान पद्धति सदोष वाटते. परंतु दोषाचे ज्ञानावरून इंद्रिय व्यापार सांगणाऱ्याचीं आयु