पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
1૮૪
आयुर्वेदांतील मूलतत्वें.

 र्वेदानें दोषांवरच रोगांची उपपत्ती सांगावी यांत सदोष काय ? ज्या उपपत्तीचे आधारे निरोगी अवस्था सांगितल्या त्याच उपपत्तीनें रोगविज्ञान सांगितलें हैं शास्त्रीय पद्धतीला धरून आहे. त्रिदोषांच्या उपपत्तीशी परिचय व तादात्म्य झाल्यास आयुर्वेदाचें इंद्रियविज्ञान तसेच रोगविज्ञान सदोष (त्रिदोषांनी युक्त ) आहे म्हणूनच तें निर्दोष आणि पूर्णपणे शास्त्रीय आहे असे कळेल. त्रिदोषांचे आधारे रोगनिदान कसें करतां येतें याविषयी सर्वसामान्य कल्पना दिग्दर्शित करून, त्याच त्रिदोषांच्या आधारे चिकित्सेची योजना कशी होते याविषयीं विचार करूं. (निदान, चिकित्सा हे विषय स्वतंत्र आहेत त्यांचा विचार या छोटयाशा निबंधांत पूर्ण होणारा नाहीं. हे केवळ दिग्दर्शन केले आहे. )

______________
त्रिदोषांचा चिकित्सेतील उपयोग.

 आयुर्वेदाचें शरिरविज्ञान आणि रोगविज्ञान त्रिदोषांवर अवलंबून आहे त्याचप्रमाणे चिकित्साहि यांचे धोरणानेंच सांगितली आहे. उपचार अथवा चिकित्सा धातु किंवा मळ यांवर करावयाची नसून या धातु व माळामध्ये असणाऱ्या दोषांवर करावयाची असा अभिप्राय आहे. शारीरिक सर्व क्रियांचा तीन क्रियांमध्ये अंतर्भाव, सर्व रोगांची कारणें तीनच दोष, सर्व लक्षणें आणि रोगांचें त्रिविध स्वरूप या सर्व गोष्टी ध्यानी घेतां चिकित्सेचे स्वरूपहि त्रिविध असणें स्वाभाविक आहे. मात्र निरनिराळ्या स्थानविभागानुरूप व दोषांचे विशिष्ट अंशानुरूप हैं धोरण बदलावें लागतें. एकाद्या दोषाचे अनेक विकार जसे त्या स्थानांतील अंशभेदाला अनुसरून संभवतात परंतु सर्व सामान्य रीतीनें सर्व विकार दोषाचे नांवाने संबोधले जातात, त्याचप्रमाणे चिकित्साहि सामान्यत्वे दोषांवर असली तरी ही विशिष्ट स्थानावर परिणाम करणारी असावयास पाहिजे. रोग एकांगी अथवा सर्वांगी असेल त्या मानानें एकांगपरिणामी अथवा सर्वांगपरिणामी उपचारांचे स्वरूप असावयाचे. मात्र सर्वहि विकारांमध्ये वायु, पित्त व कफ या दोषांचे परिणाम, क्षोभ, अभिताप व अभिष्यंद हे असल्याने स्थानानुरूप असे उपचारांमध्ये अनेक पोटभेद संभवले तरी, क्षोभशामक, अभितापशामक व अभिष्यंदनाशक असे सर्व उपचारांचे तीनच मुख्य प्रकार होतात. आणि यावरूनच सर्व उपचारांचे थोडक्यांत वर्णन करीत असतां. -

बस्तिविरेको वमनं तथा तैलं घृतं मधु ॥ ( वाग्भट )

 अर्थ :- वायु, पित्त आणि कफ यांवर अनुक्रमें बस्ति, विरेचन व वमन हे शोधन उपचार, आणि, तेल, तूप व मध हे शमन उपचार मुख्य आहेत, असे सांगितले आहे.