पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८५
त्रिदोषांचा चिकित्सेतील उपयोग.

  सर्वांगीण विकारांवर मुख्यतः शोधन उपचारांची अवश्यकता असते. कारण, दोषांच्या मुख्य स्थानांत त्यांची वाढ होऊन व दूषित स्वरूप येऊन ते इतर सर्व शरीरभागांत पसार पावतात. आणि याचसाठीं वाढून दूषित स्वरूप पावलेल्या दोषांना शरीराबाहेर काढून टाकणे हाच उपाय श्रेयस्कर असतो.

यदीरयेदवहिदोषान् पंचधा शोधनं च तत् ॥ ( वाग्भट )


  अर्थ – जें ( औषध उपचार ) बिघडलेल्या दोषांना शरीराबाहेर काढून टाकतें तें शोधन समजावें.

 एकांगी विकारांत मार्गरोधजन्य वाढ असते अर्थातच त्यासाठीं, शमन उपाय योजावयाचे. शमन म्हणजे.-

नशोधयति यद्दोषान् समान्नोदीरयत्यपि ।
समीकरोति विषमान शमनं तच्चसप्तधा ॥ १ ॥ (वाग्भट.)

  जें दोषांना बाहेर काढून टाकीत नाहीं, त्याचप्रमाणे समस्थितीतील दोषांना वाढवीत नाहीं तर विषन दोषांना सम करते त्याला ( त्या औषधाला ) शमन समजावयाचें.

 तात्विक भाषेत शमन म्हणजे स्थानी शोधनच असते असे म्हणावयास हरकत नाहीं. कोप अथवा उन्मार्गगामिता उत्पन्न होऊन एकादा दोष भलत्या जागी सांठतो अर्थात् त्या ठिकाणी अनैसर्गिक संचयच होत असतो. आणि हा संचय ज्या कोणत्या उपायानें दूर होईल त्याला शोधन मात्र स्थानी असें नांव देण्यास अडचण नाहीं. अशा विकारांमध्ये दोषाचा -हास करावयाचा नसतो. कारण त्याची तत्वतः वाढ झालेली नसून केवळ कोप, उन्मार्गगामिता अथवा वैषम्य असतें आणि तें दूर करावयाचें. दोपाचा -हास करावयाचा नाहीं. या तत्वाची जाणीव राहण्यासाठी या उपायाला शमन या नांवाने संबोधणे सोयीचे आहे. जसेंः- ज्वरामध्ये ताप वाढलेला असुन अधिक उष्णता हाच त्रास देणारा रोग असतो. व पित्ताशिवाय ज्वर नाहीं असा यामुळे सिद्धांतही आहे. परंतु ज्वरावर शोधन हा उपाय नाहीं त्यावर लंघनच सांगितलें आहे याचे कारण त्वचा अथवा धातु यांमध्ये जी उष्णता किंवा पित्त वाढले असतें त्याची शरिरांत तात्वतः वाढ झालेली नसून पच्यमानाशयांत अवश्य असणाऱ्या पित्ताची उन्मार्गावस्था असते ह्मणून उपाय पित्तनाशक केल्यास - शोधन उपाय योजल्यास- पित्ताचें शरिरांतील प्रमाण कमी होईल. तें न व्हावें व त्वचेतील पित्त मात्र नाहींसें होऊन पचनक्रिया सुरळीत चालू व्हावी व अशा प्रकारें पित्ताचें वैषम्य नष्ट व्हावे यासाठी लंघन, पाचनरूपी शमनोपायांची योजना करावयाची.

दीपनं, पाचनं क्षुत्तृटव्यायामातपमारुताः ।