पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/१९९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८६
आयुर्वेदांतील मूलतत्वें.

 दीपन, पाचन, उपवास, पाणी न पिणें, व्यायाम, उन्ह व वारा (हे शमनाचे प्रकार आहेत ).
 "येत्वेनां पित्तस्य स्थायकृष्टिं न विदेति ते दाहोपलंभेन पित्तवृद्धि मन्यमानाः पित्तं द्रासयंतः पित्तक्षयलक्षणं रोगांतरमुत्पादयंत आतुरमतिपातयंति । इति भट्टार हरिचंद्रः " ( मधुकोश ).}}
 अर्थः- जे ही पित्ताची अन्यस्थान गति जाणीत नाहींत ते दाह पाहून पित्ताची वाढ समजून, ते कमी करून पित्तक्षयरूपी नवा रोग उत्पन्न करून रोग्याला अधिक रोगी करतात.
 शमनाचें हें धोरण सर्व स्थानीविकारांत सारखेच असतें. मात्र अशा रीतीनें स्थानांतरगत दोष ज्या स्थानांत संचित होतो तेथून त्याला काढावाच लागतो. आणि त्या स्थानापुरती ती चिकित्सा शोधन असते. जोपर्यंत एकाद्या भागांत रोगकारी दूषित द्रव्य-दूषित दोष- आम आहे तोपर्यंत तो शरीरभाग निरोगी होणें शक्य नाहीं. उपचारांमध्ये स्थानी व सर्वांगीण असा फरक दाखविणारे हे दोन प्रकार आहेत, येवढाच याचा अर्थ असून शास्त्रीय व्यवहाराचे सोयीसाठी शमन व शोधन हे शब्द अनुक्रमें स्थानीशोधन व सार्वदेहिक शोधन यांचे वाचक योजले आहेत हैं चिकित्सकानें ध्यानी ठेवण्यासारखे आहे. निरनिराळ्या विकारांमध्ये उत्पादक दोषविकृती ही भिन्न स्वरूपाची असल्याने रोगनाश होईपावेतों निरनिराळ्या अनेक प्रकारच्या उपचारांचा अवलंब करावा लागतो तरी मुख्य धोरण ठरविण्याला अशा प्रकारची व्यवस्था जरूर असते. खचित् शोधन व शमन अशा दोनहि प्रकारांचा अवलंब करावा लागेल. क्वचित् शमनांपैकीं अनेक उपाय योजावे लागतील. हे खरे असले तरी शोधनाने सर्वांगीण शुद्धि आणि शमनाने स्थानीशुद्धि होते या तत्वाला बाध येत नाहीं.
 शोधन ही चिकित्सा सार्वदेहिक विकार घालविण्यासाठी आहे. बस्ति, विरेचन आणि वमन हे तीन शोधनाचे मुख्य प्रकार अनुक्रमें वायु, पित्त व कफ यांचे शोधन उपाय असून त्रिदोषांची मुख्य स्थानें जी पक्वाशय ( वायूचें ) पच्यमानाशय ( पित्ताचे) आणि आमाशय ( काफचे ) यांत वाढून दूषित झालेल्या दोषांना शरीराबाहेर काढून टाकतात. या उपायांचा प्रत्यक्ष परिणाम पक्वाशयादि स्थानांवर झालेला दिसतो. बस्तीनें पक्वाशय शुद्ध होतो, विरेचनानें पच्यमानाशय शुद्ध होतो. व वमनाने आमाशय स्वच्छ होतो. या शोधनाने त्या त्या आशयांतील पचन मलोत्सर्जनादि नित्यक्रिया सुरळीत चालतील ही गोष्ट सहज ध्यानी येणारी आहे. परंतु या उपायांनी सार्वदेहिक विकारांवर परिणाम कसा व्हावा ? अशी शंका येणे स्वाभाविक आहे. आणि हे