पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/२०

हे पान प्रमाणित केलेले आहे.
त्रिदोषकल्पनेचा उगम.

आयुर्वेदाचा यथार्थ लेखांकित पट आहे याचा विचार झाला पाहिजे. कदाचित् प्राचीनांचें तें अज्ञानाच्छादनहि असेल. पण याच आवरणाचा आश्रय त्यांनी कां केला हा प्रश्नहि शोधकबुद्धीला विचारणीय वाटला पाहिजे तात्पर्य काय, सांप्रतकालीं आयुर्वेदीय मूलतत्वे जी वायु, पित्त आणि कफ हे त्रिदोष त्यांचा खुलासा अवश्य आहे. आयुर्वेदीय ग्रंथ इतर भारतीय शास्त्रग्रंथांप्रमाणे सूत्रमय असल्याने अर्थबोध सुगम नाही. करितां या त्रिदोषांविषयी यथार्थ कल्पना थोडी तरी यावी आणि त्यायोगें आयुर्वेदाचा योग्य आदर व्हावा या हेतूने आयुर्वेदाच्या मूलतत्वांचा थोडा विचार करण्याचे योजिले आहे. भासत असलेली उणीव अंशतः तरी दूर व्हावी येवढ्याच उद्देशाने हा प्रयत्न आहे आणि यामुळे आयुर्वेदांतील तत्वविवेचनासंबंधी लोकांत थोडा तरी आदर वाढला, निदान गैरसमज दूर झाला तरी हा प्रयत्न सफल झाला असे होईल.

________________


विषयोपन्यास.
-----0-----
त्रिदोषकल्पनेचा उगम.

विसर्गादानविक्षेपैः सोमसूर्यानिला यथा।
धारयति जगद्देहं कफपित्तानिलास्तथा ॥१॥

[सुश्रुत सू. स्था. भ. २१.]

  विसर्ग म्हणजे देणे, भर घालणे किंवा पोषण करणे, आदान म्हणजे शोधून देणे, आत्मसात् करणे आणि विक्षेप म्हणजे उत्सर्जन करणे अगर फेंकणे या क्रियांनी क्रमाने सोम, सूर्य आणि वायु है ज्याप्रमाणे जगाचं धारण करितात त्याप्रमाणे याच क्रियांनी कफ, पित्त आणि वायु हे शरीराचे धारण कारतात.
 श्रीमत् जगच्चालकाचे अतर्क्य इच्छेने किंवा यदृन्छाप्रमाणाने निर्माण झालेली जी असंख्य पदार्थस्वरूपी सृष्टि तिची मूलतत्वे पृथ्वि, आप, तेज, वायु आणि आकाश ही पंचमहाभूतें होत.आणि या पंचमहाभूतांच्या काही विशेष प्रकारच्या असंख्य मिश्रणांनी असंख्य पदार्थ निर्माण झाले आहेत. या पंचमहाभूतांचे स्वरूप असें आहे की, या सर्वांत पृथ्वि ही अत्यंत घन स्वरूपाची, आप् तीहून विरल स्वरूपाचे म्हणजे त्यांत घनता असते परंतु ती फार कमी असून आर्द्रतेमुळे पातळपणा आहे. तेज प्रकाशस्वरूपी आहे प्रकाशणे हा त्याचा धर्म. या प्रकाशस्वरूपी तत्वाला काही तरी आश्रय पाहिजे असतो. तेज हे घनस्वरूपी पार्थिव व