पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/२०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८९
त्रिदोषांचा चिकित्सेंतील उपयोग.

 विकार निर्माण होतात. असल्या द्रव्यापासून झालेले आणि होणारे विकार टाळण्याकरतां त्याचें शरीराबाहेर उत्सर्जन होणें अवश्य होय. शरीराच्या अनेक भागांतील असंख्यात स्रोतसांमध्ये जें आमद्रव्य रक्ता बरोबर घुलून विकार करणार तें त्या स्रोतसांतून बाहेर काढावयास पाहिजे. ज्याप्रमाणें रसाबरोबर ( रक्ताबरोबर ) त्याचा सर्व शरीरभर प्रसार होतो त्याचप्रमाणें त्या स्रोतसांतील स्थानी पचनक्रियेनें पचन होऊन कांहीं कालानें आम व शुद्ध धातु यांचे पृथक्करण होते, अथवा आमाची अति वाढ झाल्याने स्रोतसे पूर्णपणे भरून त्याचा अभिष्यंद होतो व अशा प्रकारें या स्रोतसांतून निघालेला आमरूपी दूषित पदार्थ पुनश्च वायूच्या संकोच क्रियात्मक आकर्षणाने कोट्यांत परत येतो. हा जो शारीरिक निसर्गक्रम त्यालाच अनुसरून शोधनोपायांची योजना आहे. बस्ति, विरेचन आणि वमन हे शोधन उपाय योजण्यापूर्वी स्नेहन स्वेदन सांगण्याचा उद्देश हाच आहे. स्नेहनाने शरीरांतील स्रोतसे स्निग्ध झाली म्हणजे स्वेदन क्रियेने या स्रोतसांतील दोषांचे हणजे दोपविशिष्ट आमद्रव्याचें वियोजन होऊन ते वायूच्या आकर्षक सामर्थ्याने (रक्ताच्या परत येण्याच्या गतीनें ) परत कोट्यांत येतात. व मग शोधनानें त्यांना शरीराबाहेर काढण्यांत येते. अशा प्रकारें शरीरांत पसरून रोग उत्पन्न करणारें जें दूषीत विपारी आमद्रव्य त्याचा नाश करतां येतो.
 या आमद्रव्याचीं त्रिदोषांना अनुसरून तीन स्वरूप असतात. एक कफविशिष्ट, दुसरें पित्तविशिष्ट आणि तिसरें वातविशिष्ट. याचा उघड अर्थ असा की, दूषित कफ, दूषित पित्त व दूषित वात यांचा प्रसार सर्व शरीरभर होतो. आणि या तीन दोपांनी तीन प्रकारचे विकार होतात. कोठ्यांत आमाशय, पच्यमानाशय आणि पक्वाशय असे प्रमुख तीन विभाग त्यांतच अनुक्रमें या तीन प्रकारच्या दूषित पदार्थांची उत्पत्ति व्हावयाची. आमाशयांतील दूषित कफ, लहान आतड्यांतील दूषित पित्त व पक्वाशयांतील दूषित वायु ह्यांचा सर्व शरीरांत प्रसार झाला म्हणजे त्या त्या दोषांचे विकार होतात. त्रिदोषांचें सर्व शरीर- व्यापी सात्विक स्वरूप ध्यानांत घेतलें असतां, प्रत्येक ठिकाणी असणारा जो स्निग्ध पदार्थ, त्यामध्ये या दूषित कफाची, प्रत्येक स्थानांतील पाचक रसांत-पित्तांत- दूषित पित्ताची भर व स्रोतसांतील वायूमध्ये वायूची भर पडणार हे उघड झालें. कफ आणि पित्त हे अन्नरसांबरोबर शरीरांत प्रसार पावावेत हैं सहज पटण्यासारखे आहे. प्रवाहि पित्त आणि बहुतांशीं असल्याच स्वरूपाचा कफ यांचे अनुक्रमें अन्नरस, रसधातु, रक्त आणि रसरक्तवाहि स्रोतसे यांतील अभिसरण उघड दिसणारें आहे. आणि यावरून शरीरांतर्गत स्रोतसांतील दूषित कफपित्तांची व्याप्ती सहज कळण्यासारखी आहे. परंतु वायूची गोष्ट तशी नाहीं.