पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/२०६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९३
रोगनाशक सामर्थ्य.

 चिकित्सेमध्ये उत्पादक दोषाच्या खुलाशासाठी केला जातो. सर्वसामान्यतः वातरोगनाशक उपचार करावयाचे असतां, वातनाशक उपचार परंतु ते वायूचे रुक्षशीतादि कोणत्या गुणांच्या विरुद्ध हैं समजावयास पाहिजे.
औषधांचे द्रव्यांचे गुण सांगत असतां अशा प्रकारचा खुलासा निघंटु- द्रव्यगुणवर्णन- पंथांत असतो. गुणवर्णनामध्ये दोषनाशक म्हणून सांगून शिवाय ज्या गुणानें दोषनाश व्हावयाचा त्याचाहि उल्लेख केलेला असतो. व त्या गुणाला अनुसरून दोषनाशक उपयोग मानावयाचा. एकादें वातनाशक द्रव्य उष्ण गुणाने वातनाशक तर एकादें स्निग्ध गुणाने आणि एकादे दोनहि गुणांनी वातनाशक असें असतें. उपयोग करावयाचे वेळी वाढलेल्या वातगुणाचा विचार करून त्याचे विरुद्ध गुणाच्या पदार्थाचा उपयोग करावा लागतो. जसें सुंठ, वातनाशक आहे. लसूण, वातनाशक आहे, तेल वातनाशक तूप वातनाशक दूधहि वातनाशक परंतु या पदार्थांतील वातनाशक गुणांत अंतर असतें. सुंठ, लसूण, उष्ण गुणानें वातनाशक ( वातनिबंध घालविणारे) तेल स्निग्ध व उष्ण, तर तुप स्निग्ध गुणानें आणि दूध तर शीतहि आहे. पण केवळ स्निग्ध गुणाची वाढ व रूक्षता वायूचा हा गुणच कमी करणारे, सुंठ, लसूण, हे पदार्थहि कांहीं प्रमाणांत स्निग्ध आहेत. परंतु त्यांतील उष्ण आणि विबंधनाशक हा गुण महत्वाचा असुन ज्यावेळी मार्गावरोधामुळे वायूचा कोप होऊन एकादा विकार झाला असेल त्या वेळी या असल्या पदार्थांचा उपयोग ज्यावेळी वायूची वाढ धातुक्षीणता व रूक्षता यामुळे झाली असेल त्यावेळीं तूप, दूध असले पदार्थ पाहिजेत. तेल हैं उष्ण स्निग्ध विबंध नाशक असल्याने सर्व वातनाशक पदार्थांमध्यें तें उत्तम म्हणुन सांगितलें आहे. रोगकारी वायूची अवस्था बहुधा आवृत किंवा अवरुद्ध अशी असते व म्हणुन विबंधनाशक पदार्थ वायूवरील उपचार असतात. परंतु स्निग्ध व वातनाशक आणि उष्ण वातनाशक, इत्यादि प्रकारचे पोटभेदाची अवश्यकता समजणे अवश्य असतें.

" वृद्धिःसमानैः सर्वेषां विपरीतैर्विपर्यथः " ( वाग्भट. )

 सर्व गुणांची वाढ समान पदार्थांनीं आणि क्षय विरुद्ध गुणांचें पदार्थांनी होतो. या सामान्य नियमानुसार वाढलेल्या गुणाला विरूद्ध असें उपचारांचें धोरण असतें. अशा प्रकारें फरक असला तरी गुरु मंद इत्यादि त्रिदोषांच्या मुख्य वीस गुणांचा तीन दोषांत अंतर्भाव होत असल्याने त्या त्या दोषांतील कोणत्याहि गुणाचा उल्लेख सामान्यतः दोषांचें नांवाने करण्यांत येतो. निदान चिकित्सेचे वेळीं त्यांचें पोठभेदाचा विचार करावयास पाहिजे.