पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/२०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९४
आयुर्वेदातील मूलतत्वें.

 विशिष्ट रोगावरील चिकित्सेमध्ये द्रव्य प्रकार मुख्य असतो. एकादें एकाद्या रोगावर गुणकारी होतें. याला कारण त्या द्रव्यांतील नैसर्गिक आणि विशिष्ट प्रकारचें सामर्थ्यच असतें, असल्या रोगांवर सर्व सामान्य उपाय योजना अपशस्वी असते. विशिष्ट ह्मणजे त्या त्या रोगांना विनाशक असले उपाय म्हणजे रोगचिकित्सा समजावयाची. कफामुळे, श्वास, कास, क्षय, वांती, सूज इत्यादि विकार होतात व " दोषा एव हि सर्वेषां रोगाणामेककारणं । " दोषच सर्व रोगांचें मुख्य कारण आहेत. या नियमान्वयें कफजन्य विकारांत सर्वसामान्य कफनाशक चिकित्सेचा उपयोग करावा. परंतु एकाच कफाच्या निरनिराळ्या गुणांमुळे आणि निरनिराळ्या स्थानांमध्ये असणाऱ्या अंशांनी निराळ्या प्रकारचे अनेक रोग संभवतात. त्याचप्रमाणे त्या भिन्न प्रकारच्या रोगांवर भिन्न प्रकारची औषधे असावयास पाहिजेत. सामान्यतः दोष विनाशक औषधांचा परिणाम होणार नाहीं असें नाहीं. पण तो अप्रत्यक्ष रीतीनें, म्हणजे सर्व शरीरावर जो सामान्य परिणाम होणार त्याहून रोग स्थानीय प्रतिकारशक्तीमुळे थोडा अधिक इतकेंच. परंतु असल्या उपायांना रोगनाशक औषध म्हणतां येणार नाहीं ; तें दोषनाशक होऊ शकेल. चिकित्सेंतील दोषनाशक व रोगनाशक असे हे दोन मुख्य प्रकार महत्त्वाचे आहेत. यांनाच सामान्यचिकित्सा व विशेष चिकित्सा अशी नांवें योजिलीं आहेत. सामान्यचिकित्सा ही विकृत दोषांना घालविणारी अर्थात् रोगप्रतिबंधक होय. आणि विशिष्टचिकित्सा ही विनाशक ( रोगनाशक ) समजावयाची. आयुर्वेदांत या दोन प्रकारांचा उल्लेख हेतुप्रत्यनीक आणि व्याधिप्रत्यनीक या नांवांनीं केलेला आहे. या दोन प्रकारांमध्ये व्याधिप्रत्यनीक किंवा रोगनाशक चिकित्सा अधिक महत्त्वाची. आणि आयुर्वेदीय चिकित्साथांतील हजारों औषधीकला या रोगविनाशक स्वरूपाचेच आहेत. निदानामध्यें ज्याप्रमाणे रोगस्थानीय विकृतिविज्ञान महत्त्वाचे त्याप्रमाणें चिकित्सेमध्ये रोगस्थानपरिणामी द्रव्यप्रभाव महत्त्वाचा. म्हणजे रोग तितकीं औषधे आणि जितक्या रोगावस्था तितक्या औषधियोजना हैं चिकित्सेचे तत्व उघड होतें. व्याधिप्रभाव आणि द्रव्यप्रभाव हे शब्द याच अर्थाचे बोधक म्हणून आयुर्वेदांत अनेक ठिकाणी दिसतात.
 अशा रीतीनें नैसर्गिक द्रव्यप्रभाव हाच रोगविनाशक ठरल्यावर मग आणखी या त्रिदोषांची गरज काय ? अमुक औषध अमुक रोग घालवितें, तो त्याचा प्रभाव इतकें सांगितल्यानें कार्यभाग झाला. मग वातादि दोषांचा संबंध कोठें येतो ? रोग एकाद्या शरीरभागांत होत असतां जी विकृति होते तीचें सामान्य स्वरूप त्या त्या स्थळांतील विकृति असले तरी ही विकृति वातादि दोषांतील ज्या एक अथवा अनेक दोषांच्या