पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/२११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९८
आयुर्वेदांतील मूलतत्वें.



याप्रमाणे आयुर्वेदांतील वात-पित्त-कफांविषयींचा एकंदर खुलासा होतो. एकंदर विवेचनाचा निष्कर्ष येणेप्रमाणे.


  ( १ ) त्रिदोषांची आयुर्वेदीय कल्पना जीवनव्यापारांतील क्रियांचे त्रिविध स्वरूपाला अनुसरून निर्माण झाली.

  ( २ ) वायु, पित्त आणि श्लेष्मा या नांवांनी या त्रिविध जीवन- व्यापारांचा आणि हे व्यापार घडविणाऱ्या पदार्थांचा आयुर्वेदानें उल्लेख केला आहे.
  ( ३ ) वातादि दोषांचें वर्णन या क्रिया घडविणा-या पदार्थांचें सहज स्वरूप आहे.
  ( ४ ) तीन दोष व त्यांचे सांगितलेले वीस गुण यांमध्ये सर्व पदार्थांतील गुणांचा अंतर्भाव होतो.
  ( ५ ) आणि या द्रव्याश्रयी गुणांचे तीन वर्ग म्हणजे तीन दोष.
  ( ६ ) व म्हणूनच शारीर पदार्थ व शरीराबाहेरील पदार्थ यांचा वीस गुण किंवा त्या गुणांचे तीन वर्गांचे वाचक तीन दोष हे सर्व व्यापी तत्वें होऊं शकतात.
  ( ७ ) त्रिदोषांचें तात्विक स्वरूप ध्यानी घेऊन त्यांचा अनेक स्थानांतील कार्यकारी संबंध ध्यानी घेतला की स्वस्थ शरीरांतील जीवनव्यापाराचा खुलासा होतो.
  ( ८ ) व अर्थात् त्यांचे विकृत स्वरूपाचें ज्ञान रोगंसप्राप्तीचे बोधक होण्याला प्रत्यवाय नाहीं.
  ( ९ ) याचप्रमाणे शरीतील एकाद्या गुणाची वाढ अथवा -हास झाला म्हणजे होणाऱ्या रोगांवर त्या त्या गुणाचा -हास अथवा वाढ करून रोगनाश होत असल्यानें गुणसमुदायवाचक दोषांनी चिकित्साभेदांचा निर्देश केला आहे.
  ( १० ) पदार्थांचे गुण ज्या शारीरगुणांशी संलग्न होऊन परिणामकारक होणारे असतात तो शारीरिक गुण वातादीचे नांवाने संबोधले असल्याने त्याच नांवानी गुणधर्माचा उल्लेख करणे विसंगत नसून सुसं-गतच आहे.
  ( ११ ) कर्तृत्वसंपन्न व अत्यंत महत्त्वाच्या वातादींना दोष हें नांव चिकित्सा शास्त्राने दिलें त्याचे कारण रोगोत्पादक अवस्थेकडे लक्ष्य वेधावे इतकेंच.
  ( १२ ) समावस्थेत वातादि पदार्थच देहधारक असतात व त्यांना धातु हैं नांवही योग्य होईल.
  ( १३ ) कर्तृत्वसंपन्न अशा तीन दोषांशिवाय चौथा कोणताही पदार्थ शरीरांत नाहीं कीं, जो स्वतंत्रपणे शरीरावर इष्टनिष्ट परिणाम करूं शकेल.