पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/२१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९९
रोगनाशक सामर्थ्य.

  ( १४ ) शरीरांत ज्या कोणत्या भागांत एकादी विकृति उद्भवते तिचें आद्य कारण सर्वव्यापी अशा त्रिविध जीवनव्यापारांतील एकादा विकृत होणें हें असतें व त्याचे ज्ञान हाच निदानांतील त्रिदोषसंबंध होय.
 ( १५ ) विकृत जीवनव्यापाराला सुव्यवस्थित करण्याचे धोरण हैं मुख्य असल्याने त्याचा बोध होण्यासाठीं चिकित्सा आणि त्रिदोष यांचा संबंध आहे.

त्रिदोष वर्णनावरून आयुर्वेदाने शरीराचे जीवनव्यापाराविषयी स्वीकारलेली कांहीं तत्वें--


 ( १ ) शरीर हैं पांचभौतिक - परमाणूंच्या समुदायानें झालें आहे.
  ( २ ) हे परमाणु नित्य नवे उत्पन्न होतात अर्थात् नित्य झिजतात.
  ( ३ ) झीज व वाढ ही त्यांतील बाह्य भागाची अथवा आवरणाची होते; व त्यांतील सूक्ष्म अंतर्भाग, अविनाशी असतो.
 ( शंभर किंवा कमी अधिक वर्षांच्या विशिष्ट आयुर्मर्यादेपर्यंत. )
  ( ४ ) ही झीज आणि वाढ किंवा उत्प्तत्ति विनाश हाच जीवनव्यापार.
  ( ५ ) या जीवनव्यापारांच्या तीन अवस्था आहेत एक संग्रह, दुसरें पचन - पृथकारण. तिसरें वियोजन - उत्सर्जन.
 ( ६ ) हा त्रिविध जीवन व्यापार शरीरघटकांतील सूक्ष्म अशा अणूंनी घडतो.
 ( ७ ) ते अणु मुख्य पदार्थ होत.
 ( ८ ) त्यांना अनुक्रमें श्लेष्मा, पित्त व वायू हीं नांवें दिली.
  ( ९ ) यांचेमुळे शरीर दूषित होते म्हणून त्यांना चिकित्सा- शास्त्रांत दोष या नांवाने संबोधावें.
 ( १० ) शरीराच्या या जीवनव्यापाराला व्यत्यय येणें रोग होय.
 ( ११ ) शारीरपदार्थाचे रासायनिक पचनकार्यांत सात पदार्थ, तयार होतात.
 ( १२ ) प्रथम रस, मग विशिष्ट उष्णतायुक्त रक्त, मग त्याहून घन मांस मग त्यापासून स्निघ्न पदार्थ मेद, त्यापासून कठिण व स्थिर हाडें त्यांपासून मज्जा व त्यांपासून शुक्र.
 ( १३ ) या सात अवस्थांतरांतील पदार्थानी शरीर भरले आहे.
 ( १४ ) या प्रत्येक पदार्थामध्ये तीन अवस्था असतात. १ नवीन होणारी. २ झिजलेली किंवा मल स्वरूप व या दोनहि उत्पद्यमान अवस्थेतील व क्षीयमान अवस्थेतील पदार्थांचे उत्पादकार्य करणारी तिसरी अवस्था.