पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/२२

हे पान प्रमाणित केलेले आहे.
लो. टिळक ग्रंथसंग्रहालय, वाई


पदार्थाची उत्पत्ती.

ओलेपणानेच हे परमाणु एकमेकांत मिश्र होण्याला लायक होतात. व अशा रितीने आप म्हणजे जलाच्या संयोगाशिवाय पार्थिव परमाणूपासून द्रव्याची उत्पत्ति होत नसल्याने द्रव्याला मुख्य कारण किंवा साधन आप हे तत्व आहे. असे सांगण्याच्या उद्देशाने 'अंबुयोनि,' म्हणजे पाणी ज्याला काण आहे असें द्रव्याचे विशेषण योजिले आहे. अशा रीतीने पार्थिव परमाणु जलाच्या संयोगाने मिश्र झाले तथापि त्यांना पदार्थाचा आकार येत नाही. पदार्थ व्हावयाचा तर नुसते परमाणु मिश्र होऊन भागत नसून त्यांचा संयोग व्हावा लागतो. ते एकमेकांना चिकटावे लागतात. आणि ते चिकटण्यासाठी तेज किंवा उष्णता आणि वायु यांची अवश्यकता आहे. उष्णतेमुळे आणि वायूमुळे पातळ झालेल्या परमाणूतील जलांशाचे शोषण होते व त्यांस जरूर तो चिकटपणा प्राप्त होतो आणि मग आकाश अगर अवकाश याला अनुसरून त्याला आकार-द्रव्यत्व-प्राप्त होते. सृष्टीचा कर्ता आज्ञेय असल्यामुळे अमुक एका पदार्थाला अशा प्रकारचाच आकार का दिला? किंवा त्यांत पंचतत्वें अमुकच प्रमाणाने का मिश्र केली याचा खुलासा करण्याला साधन नाही. स्वरूप आणि गुणधर्म यांवरून त्यांमधील तत्वांचा निश्चय ठरवून त्याचा उपयोग करून घेणे हेच मानवीबुद्धीला शक्य व इष्ट आहे. पार्थिव द्रव्याच्या उत्पत्ति स्वरूपाचे स्पष्टीकरण व्हावे यासाठी एक उदाहरण घेऊ. एकादा घट बनवावयाचा आहे. घट पार्थिव तत्वाशिवाय होत नाही. पार्थिव परमाणु अर्थात् माती हे त्याचे अधिष्टान झाले. पण केवळ मातीनेच घट होत नाही. तो बनविण्याचे ठरतांच मातीत पाणी मिळवून ती ओली करावी लागते. ओली झाल्याशिवाय घट बनणे अशक्य असल्यामुळे घटरूपी द्रव्याला पाणी हे उत्पत्ति कारण झाले. व अशा रीतीने मृत्तिकेंत पाणी घालून ती पातळ केली, परमाणूंचे मिश्रण झाले. तथापि, त्या परमाणूंचा संयोग होऊन त्यांना घटत्व येत नाही. उष्णता आणि वायु यांचे योगाने पुनः शोषण होऊन जरूर तितका चिकटपणा आल्यानंतर त्याला घटांचे रूप देता येते. घटत्व आल्यानंतरहि तो पक्का व्हावा, त्यांतील परमाणु पक्के चिकटावे-यासाठी भट्टीत घालून पुनः भाजावा लागतो. घटाचा आकार आंतील पोकळीवर, अवकाशावर--किंवा आकाशतत्वावर अवलंबून आहे. पोकळीचे अभावी तो मातीचा गोळा राहील, घटत्व नाही. पार्थिव द्रव्याची उत्पत्ति अशा रितीने झाली. ज्याप्रमाणे कुभकार आपल्या लहरीला अनुसरून मृत्तिकेचे वाटतील तसले पदार्थ बनवितो व त्यांचा जरूरीप्रमाणे तारतम्य बुद्धीने उपयोग करून घेतो. तसेंच स्वतंत्र आणि सर्वशक्तिमान् अशा सृष्टीकाने सृष्टीत असंख्य प्रकार निर्माण केले आहेत. सजीव, निजीव, अल्पज्ञ किंवा बहुज्ञानी,