पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/२४

हे पान प्रमाणित केलेले आहे.
लो. टिळक ग्रंथासंग्रहालय, वाई


११
श्लेष्म्याचे स्वरूप

तत्वं सर्वत्र शरीरांत आहेच. शरीराच्या उत्पत्तीला जशी ही शक्ति कारण आहे. त्याप्रमाणे शरीराच्या वाढीलाही तिची आवश्यकता आहे. कारण वाढ म्हणजे बाह्य सृष्टीतील पोषक पदार्थांचे परमाणु शरीरांतील घटकांशी संलग्न होऊन एकजीव होणे म्हणजे पोषण किंवा वाढ होय. आणि जी ही संधीकरण-किंवा संयोगीकरण क्रिया, ती स्लेषकशक्तीचे अभावी होणार नाही, म्हणून शरीराच्या उत्पत्तीप्रमाणे वाढीलाही ती अवश्य ठरते. श्लेषणाचे कार्य ज्या अवस्थेत होते ती पार्थिव परमाणु त्यांत संयुक्त झालेलें जल, आणि या उभयतांचें एक विशेष प्रमाणांत तेजाच्या मदतीने झालेले शोषण होय.परंतु या सर्वाना कारण जल किंवा आर्द्रता असते. ही आर्द्रता अधिक झाल्यास शरीरात शीथिल्य येते, पोषक घटक नीट संलग्न होत नाहीत व कमी झाल्यास शरीरांत शोषणकार्य अधिक होऊ लागते म्हणून आर्द्रतामूलक ही श्लेषक शक्ति शरीराच्या उत्पत्तीला वाढीला आणि आरोग्याला कारण म्हणून आयुर्वेदांत मुख्य मानिली आहे. आणि आलिंगन देणे, चिकटणे या अर्थाच्या 'श्लिष' या धातूपासून तयार झालेल्या श्लेष्मा, या नांवाने आयुर्वेदांत तिचा निर्देश केला माहे. हाच आर्यवैद्यकांतील श्लेष्मा किंवा कफ होय.
 आतां प्रत्येक अवयवांत राहून अविकृत असतां तो काय कार्य करितो, विकृत झाल्यास विकृती कशी काय करितो, आयुर्वेदात वर्णन केलेले त्याचे स्वरूप कसे आहे व ते यथार्थ आहे किंवा नाही तें पाहणे आहे.

_____________


श्लेष्म्याचे स्वरूप


  वर लिहील्याप्रमाणे श्लेष्मा किंवा कफ या नावाने संबोधिली जाणारी जी श्लेषकशक्ति तिचे आयुर्वेदांत वर्णन आहे ते याप्रमाणे:__
  "स्निग्धः शीतो गुरुमंदः श्लक्ष्णो मृत्स्नः स्थिरः कफः ॥",

 शरीरांतील कफ स्निग्ध म्हणजे ज्यांत ओषटपणा किंवा तेलकटपणाचा अंश पुष्कळ आहे, ज्याचा स्पर्श शीत आहे, वजनाला जड, ज्याचे कर्तव्य सामर्थ्य मंद आहे असा, ज्यामध्ये चकाकी आणि बुळबुळीतपणा आहे आणि जो गतिविरहित आहे, असल्या प्रकारचा आहे. शरीरातील या गुणांना कफ ही संज्ञा आहे. गुण किंवा धर्म हा एकाद्या पदार्थाच्या आश्रयाने प्रतीत होत असतो. आणि म्हणूनच वर्णन करतांना त्या गुणयुक्त पदार्थाचे केले जाते. आयुर्वेदांतील त्रिदोषांचे वर्णनहि अशा प्रकारचेच आहे. हे वर्णन यथार्थ आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी एकाद्या चिकट पदार्थाकडे पाहावे म्हणजे झाले. हा पदार्थ म्हणजे कफ, पृथ्वी आणि आप यांच्या अंशाधिक्याने बनला